दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पहिल्यांदाच मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने अभूतपूर्व जल्लोष केला. मात्र, त्यात त्यांनी आपापल्या बुटांमध्ये मद्य ओतून मद्यपान केल्याचे समोर आल्यावर आता त्यांच्या या वर्तनावर टीका होऊ लागली आहे. ऑस्ट्रेलियात मानल्या जात असलेल्या एका अंधश्रद्धेपोटी हे कृत्य केल्याचे आता बोलले जात आहे.
आपल्याला येत असलेले अपयश दूर होण्यासाठी तसेच यश मिळण्यासाठी केलेल्या त्यागानंतर आपल्या बुटात मद्य ओतून ते पिणे चांगले मानले जाते. मात्र, आताच्या काळात या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धाच समजले जाते. तरीही ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी हे कृत्य केले. या कृतीला शुई असे संबोधले जाते.
ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आणि टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक पाच वेळा जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत मात्र, 2007 सालापासून सातत्याने अपयशी ठरत होता.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला 2007 साली प्रारंभ झाला. अखेर यंदा ऑस्ट्रेलियाला या विजेतेपदावर आपले नाव कोरण्यात यश आले. या पहिल्या विजेतेपदानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानात, ड्रेसिंग रुममध्येच नव्हे तर, विमानातही जल्लोष केला. हा जल्लोष करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकमेकांवर शॅम्पेनही फवारली.
अपयश दूर सारले
यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने सलग पाच द्विपक्षीय टी-20 मालिका गमावल्या होत्या. यात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेचा देखील समावेश होता. मात्र, आता विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदानंतर त्यांनी हे सगळे अपयश दूर सारले व यश मिळवले.