सिडनी – ऑस्ट्रेलियातील एका पत्रकार महिलेला चीनमध्ये काम करत असताना अटक करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीसाठी काम करत असताना सरकारी गोपनीय माहिती परदेशात पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चेंग ली असे या 49 वर्षीय पत्रकार महिलेचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाशी संपर्क साधून तिच्या सुटकेबाबत प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. चेंग ली निर्दोष असल्याचा आपल्याला विश्वास असल्याचेही त्यांच्या कुटुंबीयांनी वृत्तसंस्थेला ई मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
आपल्याला चीनच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तिथल्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा वेळेवर, वेगाने आणि दयाभाव दाखवून पाठपुरावा करावा, असे आवाहनही या निवेदनामध्ये करण्यात आला आहे.
चेंग ली यांना 5 फेब्रुवारीला अटक करण्यात आली, असे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिस पायेन आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेनबीन यांनी स्वतंत्रपणे दिलेल्या निवेदनात सांगितले.
चेंग ली यांचा जन्म चीनमध्येच झाला आहे. मात्र त्या आपल्या पालकांसमवेत ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅन्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. चीनमध्ये करोनाच्या साथीमुळे शाळा बंद असल्याने त्यांची 9 आणि 11 वर्षांची मुले ऑस्ट्रेलियामध्ये आजी-आजोबांना भेटायला गेलेली आहेत. याच काळात चेंग ली यांना प्रशासनाने ताब्यात घेतले.
करोनाच्या विषाणूचा उगम चीनमध्येच झाला असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाने केला आणि या विषाणूच्या उगमाबाबत शोध घेण्याचे आवाहनही आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. त्यामुळे चीन आणि ऑस्ट्रेलियातील संबंध बिघडले आहेत. चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीसाठी वृत्तनिवेदिका म्हणून काम करणाऱ्या चेंग या ऑस्ट्रेलियातील दूतावासातील कार्यक्रमांनाही उपस्थित राहात असतात. याच कारणास्तव त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे.
चेंग ली यांच्या अटकेचा मुद्दा ऑस्ट्रेलियाने गांभीर्याने घेतला असून चीनकडे याबाबत पाठपुरावा केला जात आहे.