बर्लिन – जर्मनीतील एका 95 वर्षीय महिलेवर तब्बल दहा हजार जणांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. 1943 ते 1945 या काळातील या घटना असल्याचे सांगितले जात असून संबंधित महिला नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये स्टेनो आणि कमांडरची सेक्रेटरी म्हणून काम करत होती.
दुसऱ्या महायुध्दाच्या काळात नरसंहाराच्या जेवढ्या घटना घडल्या आहेत, त्यावरील कारवाईची व्याप्ती वाढवण्यात यावी असा निर्णय 2011 मध्ये जर्मनीने घेतला आहे. ज्यांचा हत्याकांडात अप्रत्यक्ष सहभाग होता त्यांनाही कारवाईच्या कक्षेत आणण्याचे ठरवण्यात आले आहे. तत्कालीन नाझी राजवटीत जे प्रमुख नेते होते त्यांच्यावर कारवाई व्हावी असे अगोदर जर्मनीच्या न्यायालयांचे म्हणणे होते.
सध्या पोलंडमध्ये असलेल्या स्टटहॉफ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्येच 65 हजारपेक्षा जास्त लोकांना ठार करण्यात आले होते. यातील 28 हजार जण ज्यू धर्मीय होते. अनेकांना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारण्यात आले होते. तर उर्वरीत लोकांची गोळ्या घालून अथवा विषारी इंजेक्शन देउन हत्या करण्यात आली होती. प्रचंड खालावलेली आरोग्य स्थिती आणि अशक्तपणामुळेही कित्येक जणांचा मृत्यू झाला होता.
स्टटहॉप कॅम्पमध्ये स्टेनो म्हणून काम केलेल्या महिलेवरही आता आरोप दाखल केले जाणार असल्याचे सरकार पक्षाकडून शुक्रवारी सांगण्यात आले. जर्मनीच्या गोपनीय कायद्याच्या आधारे या महिलेचे नाव उघड करण्यात आलेले नाही. मात्र ही 95 वर्षीय महिला इमग्राड एफ असल्याचे स्थानिक माध्यमांतून बोलले जात आहे.
ब्रिटनच्या टेलीग्राफने दिलेल्या बातमीनुसार सबंधित महिला निवृत्त झाली असून तिला पेन्शन दिले जाते व सध्या एका निवारा गृहात राहते आहे. संबंधित महिलेने 2019 मध्ये जर्मन रेडिओला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, महायुध्द संपेपर्यंत कॅम्पमध्ये लोकांना ठार केले गेले असल्याची आपल्याला माहिती नव्हते. युध्द संपल्यावरच आपल्याला हे समजले असे तिने म्हटले होते.
हत्याकांडाच्या घटना घडल्या तेव्हा ही महिला अल्पवयीन होती. त्यामुळे अल्पवयीनांसाठी असलेल्या न्यायालयातच तिच्यावर खटला चालवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ज्यूंच्या हत्येसाठी जे लोक जबाबदार होते त्यांना मदत करण्याचे काम या महिलेने केल्याचा आरोप आहे. दरम्यान, ज्यूंच्या हत्येसाठी एखाद्या महिलेवर आरोप केले जाण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे असे नाही. मात्र पूर्वी सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या एका महिलेला आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार मात्र पहिल्यांदात होतो आहे.