मेलबर्न – कर्णधार पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क यांच्या गोलंदाजीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दुसर्या कसोटीत ७९ धावांनी पराभव केला. या दोन संघात सुरु असलेल्या तिन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा सामना जिंकत यजमान ऑस्ट्रेलियाने तिसर्या सामन्यापूर्वीच २-० अशी अजिंक्य आघाडी गेत मालिका विजय साकार केला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ धावा करत पाकिस्तानचा पहिला डाव २६४ धावांवर गुंडाळताना ५४ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसर्या डावात सर्वबाद २६२ धावा केल्या व पाकिस्तानसमोर विजयासाठी ३१७ धावा करण्याचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात मिशेल मार्शने ९६ तर, अलेक्स कॅरी व स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतके फटकावली होती.
पाकिस्ताननेही सलामीवीर अब्दुल्ला शफीकची विकेट लवकर गमावल्यावरही जिद्दी फलंदाजी केली. त्यांच्याकडून शान मसुद व आगा सलमान यांनी दमदार अर्धशतके फटकावली. मात्र, मोक्याच्या क्षणी त्यांनी आपल्या विकेट गमावल्या. पहिल्या डावात ५ गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसर्या डावातही पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरला. त्याने याही डावात पाच गडी बाद केले. त्याचे सामन्यातील एकूण १० बळी ठरले. त्याला सुरेख साथ देताना मिचेल स्टार्कने ४ बळी मिळवले. आता या दोन संघातील तिन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना येत्या ३ ते ७ जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यात विजय मिळवत पाकिस्तानला व्हाइटवॉश देण्याची ऑस्ट्रेलियाला संधी आहे.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद ३१८ धावा. पाकिस्तान पहिला डाव – सर्वबाद २६४ धावा. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – ८४.१ षटकांत सर्वबाद २६२ धावा. (मिशेल मार्श ९६, अलेक्स कॅरी ५३, स्टीव्ह स्मिथ ५०, मिर हमजा ४-३२, शाहीन शाह आफ्रीदी ४-७६). पाकिस्तान दुसरा डाव – ६७.२ षटकांत सर्वबाद २३७ धावा. (शान मसुद ६०, आगा सलमान ५०, बाबर आझम ४१, पॅट कमिन्स ५-४९, मिचेल स्टार्क ४-५५, जोस हेझलवूड १-३४).
पॅट कमिन्सचे दोन्ही डावांत मिळून १० बळी
५-४८
५-४९