मेलबर्न – आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला असून कर्णधारपद पॅट कमिन्सकडेच कायम राखताना सलामीवीर डेव्हीड वॉर्नरचेही संघातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे.
वॉर्नरला गेल्या दोन मोसमांपासून अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. मात्र, तरीही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. या सामन्यासाठी मंडळाने 17 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. केवळ याच सामन्यासाठी नव्हे तर यानंतर इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्येच होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या प्रसिद्ध ऍशेस मालिकेसाठीही हाच संघ असेल असेही मंडळाने सांगितले आहे. मिशेल मार्श पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतल्याने त्याच्याकडे नेतृत्व कायम
राहणार आहे.
भारतीय संघाचीही लवकरच घोषणा
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघाची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे. आयसीसीकडून दोन्ही संघांच्या घोषणेसाठी 7 मे ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. पुढील आठवड्यात बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक होऊन त्यातून संघ जाहीर केला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी विजेतेपदाने हुलकावणी दिली असली तरी यंदा विजेतेपद मिळवण्याचा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (यष्टिरक्षक), ऍलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, स्कॉट बोलॅंड, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लेबुशेन, नाथन लियॉन, मिशेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.