औरंगाबाद – आईच्या अनैतिक संबंधामुळे 9 वर्षाच्या मुलाचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात घडली आहे. मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे प्रियकराच्या मदतीने आईने पोटच्या मुलाचा खून केला आहे. हा घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
सार्थक रमेश बागुल असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. संगीता रमेश बागुल आणि तिचा प्रियकर साहेबराव पवार असे आरोपीचे नाव आहेत. पोलीसांनी संगीता व तिचा प्रियकर यास ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात दरीमध्ये 17 फेब्रुवारीला एक अनोळखी मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यानंतर पोलीसांनी मृतदेहाची ओळख पटवून या खूनचा तपास करण्यास सुरुवात केली. दरम्यान अपहरणाची तक्रार देताना आणि मृतदेह सापडल्यावर आईच्या चेहर्यावर रडू किंवा दुःखाची भावना नसल्यामुळे पोलिसांना मुलाच्या आईवर संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी मुलाच्या आईला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे प्रियकराच्या मदतीने मीच त्याचा खून केला असल्याची धक्कादायक कबुली आईने पोलिसांना दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.