लक्षवेधी : चेहरा बदलून येतोय दहशतवाद

सुशांत सरीन

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात छापे टाकून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा दहशतवाद्यांना पकडले आहे. सणासुदीच्या दिवसांत देशात अशांततेचे वातावरण तयार करण्याचा त्यांचा कट होता, असा दावा आहे.

काबूलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर संपूर्ण क्षेत्रात दहशतवाद वाढेल आणि दहशतवाद्यांना अधिक पाठबळ मिळेल, अशी शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत होती. त्यालाही या दहशतवादी अटकसत्रामुळे पुष्टी मिळाली आहे. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादापुढे अमेरिकेसारखी बलाढ्य शक्‍ती आणि मित्रराष्ट्रांच्या फौजांनी नांगी टाकल्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानचाच विजय झाला असून, तोही असा आहे की पराभव होऊनसुद्धा अमेरिकेचे पाकिस्तानविषयक धोरण नरमाईचेच आहे. त्यामुळे पाकिस्तानपोषित दहशतवाद्यांचा भारताविरुद्ध अधिक वापर केला जाईल, असा कयास आहे. नुकत्याच झालेल्या अटकसत्रानंतर ही शक्‍यता खरी होताना दिसत आहे.

आपल्या सुरक्षा यंत्रणा तत्पर आहेत आणि देशविरोधी षड्‌यंत्रांचा तातडीने पर्दाफाश करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु वास्तव असे आहे की, हल्ला करण्यात दहशतवाद्यांना एकदा जरी यश आले, तरी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल. गेल्या काही दिवसांपासून असे प्रयत्न होतही आहेत. उदाहरणार्थ, काश्‍मीरमध्ये सध्या दहशतवादी कारवायांमध्ये एक प्रकारे वाढ होताना दिसत आहे.

उत्तर काश्‍मीरमध्ये सामान्यतः परिस्थिती चांगली असते, तिथेच सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे, अशीही बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून तिथे चकमकींमध्ये वाढ झाली आहे. सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांवरही हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानात उत्साहाचे वातावरण आहे, हे यावरून उघडपणे दिसून येते.

1992 मध्ये जेव्हा अफगाणिस्तानात डॉक्‍टर नजीबुल्लाह यांचे सरकार दहशतवाद्यांनी उलथवून टाकले होते, त्याही वेळी पाकिस्तानात अशाच प्रकारे आनंद साजरा केला गेला होता. काश्‍मीरच्या शांत खोऱ्यात सीमेपलीकडून दहशतवादाचे धुके पसरण्यास त्याच दरम्यान सुरुवात झाली होती, हे विशेषत्वाने उल्लेख करण्याजोगे आहे. आज पुन्हा एकदा तोच धोका आपल्यापुढे डोके वर काढू पाहत आहे.

मंगळवारी पकडलेल्या दहशतवाद्यांविषयी असे सांगितले गेले आहे की, दाऊद इब्राहीमच्या भावाबरोबर या दहशतवाद्यांचे संबंध आहेत आणि डी-कंपनीच्या नेटवर्कचा वापर केला जात होता. या प्रकरणात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचे थेट नाव घेतले गेलेले नाही. आयएसआयच्या मदतीशिवाय हे दहशतवादी एवढे दुःसाहस खरोखर करू शकतात का? अफगाणिस्तानात सत्ताबदल होताच असे सांगितले गेले होते की, हा देश आता दहशतवाद्यांचा अड्डा बनेल.

छोटे-मोठे सर्व दहशतवादी अफगाणिस्तानकडे रवाना झाले असल्यामुळे याला पुष्टीही मिळाली आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे पाठबळ असल्यामुळे भारतात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी घटनेत “नॉन स्टेट ऍक्‍टर्स’ म्हणजेच देशविरहित शक्‍ती सहभागी असल्याच्या कोणत्याही दाव्यावर आपण विश्‍वास ठेवता कामा नये, उलट पाकिस्तानचे सरकार आणि तेथील गुप्तचर संघटनांना थेट जबाबदार धरले पाहिजे.

दहशतवादाचे स्वरूप बदलले आहे, हे आपल्याला आता मान्य केले पाहिजे. किंबहुना आपल्या गुप्तचर संस्थांनी हे मान्य केलेच आहे. नवे तंत्रज्ञान आणि पद्धती वापरल्यामुळे दहशतवाद अधिक भयावह बनला आहे. दहशतवादी ड्रोनसारखी उपकरणे सर्रास वापरू लागले आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक देशांवर त्यांनी हल्ले केले आहेत.

भारतही यापासून दूर राहू शकत नाही. भारताला असलेला प्रमुख धोका असा आहे की, आपण आत्मघातकी पथके तयार करीत असल्याचे तालिबानने उघडपणे स्वीकारले आहे. त्यामुळे आज ना उद्या आपल्यावर असे हल्ले होणार हे स्पष्ट आहे. अशा प्रकारे नव्या पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून दहशतवाद्यांनी हल्ले करण्याआधीच भारताने त्यापासून बचावाची यंत्रणा उभारली पाहिजे.

बदलत्या दहशतवादाचा अन्य एक पैलू असा की, बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस उन्नत होत चालले असून, त्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. असे प्रयत्न केवळ अयशस्वी करून आणि ते करणाऱ्यांचा बुरखा फाडून आपल्याला थांबता येणार नाही, तर आपण या बाबतीत खोलात जाऊन काम केले पाहिजे.

काश्‍मीर खोऱ्यात सध्या जी सुरक्षा व्यवस्था आहे ती 1990 च्या दशकाच्या तुलनेत खूपच चांगली आहे. परंतु जेव्हा आपण आपल्या सुरक्षा व्यवस्थेची प्रगती करण्यासंबंधी बोलतो, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, सुरक्षा दलांना पारंपरिक धोक्‍यांपासून संरक्षण मिळणे गरजेचे आहेच; परंतु केवळ तेवढ्यावर थांबता येणार नाही. नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानाधारित हल्ल्यांपासूनही त्यांना सुरक्षा कवच दिले पाहिजे.

नव्या धोक्‍यांपासून बचावासाठी देशात नवीन तंत्रज्ञानाचा शोध, नवीन प्रकारचे प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञानावर विश्‍वास आणि गुंतवणूक केली जाणे आवश्‍यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. धोका निर्माण झाल्यानंतर त्याचा मुकाबला करण्याऐवजी तो येण्यापूर्वीच रोखण्याची व्यवस्था करणे आणि वेळेत तो नष्ट करणे कधीही चांगले. हीच रणनीती आपल्याला यापुढे राबवावी लागणार आहे.

एक मोठा धोका दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्सकडूनही आहे. अशा प्रकारच्या मोड्यूलमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन सर्वसामान्य लोकांमध्ये पाठविले जाते. काही काळ ते त्या ठिकाणी अगदी सामान्य जीवन व्यतीत करतात. हे दहशतवादी समाजात मिसळून गेलेले असतात; त्यामुळे त्यांचा कुणाला संशयसुद्धा येत नाही आणि सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरही ते कधी येत नाहीत. परंतु जेव्हा दहशतवाद्यांना त्यांची गरज असते, तेव्हा ते त्यांना तातडीने कोणत्याही कामासाठी उपलब्ध होतात. त्यामुळेच या धोक्‍यापासून बचावासाठी आपल्याला आपले डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजेत.

कोणतीही गोष्ट नेहमीपेक्षा थोडी जरी वेगळी दिसली, तरी सावध होण्याचे प्रशिक्षण पोलीस आणि गुप्तचर दलांना दिले गेले पाहिजे. याकामी अनेक सामान्य लोकांची मदत घेता येणे शक्‍य आहे. त्यांना या कामाशी जास्तीत जास्त संख्येने जोडले पाहिजे. 26/11 किंवा 9/11 सारख्या घटना यापुढे क्‍वचितच घडतील.

अगदीच नव्या प्रकारच्या दहशतवादाचे साक्षीदार आपल्याला व्हावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आपल्याला खूप तयारी केली पाहिजे. आपल्या सुरक्षा यंत्रणेत अजिबात दोष असता कामा नयेत. याच दिशेने आपल्याकडील सुरक्षा यंत्रणांनी काम करणे यापुढे अपेक्षित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.