अग्रलेख : आता जबाबदारी नागरिकांची!

गेल्या सुमारे पावणेदोन वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेतील अनेक महत्त्वाचे व्यवहार ठप्प झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने चार ऑक्‍टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सात ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहेत. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांचा पडदाही उघडला जाणार आहे.

करोना महामारीच्या काळात दुसऱ्या लाटेने बऱ्यापैकी हाहाकार माजवल्यानंतरच्या काळात सर्व काही बंद असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता आणखी काही महत्त्वाचे व्यवहार सुरळीत सुरू होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हायसे वाटत असले, तरी याच निर्णयाची दुसरी बाजू म्हणजे आता नागरिकांची जबाबदारी वाढली आहे, हे विसरून चालणार नाही.

महामारीच्या दुसऱ्या लाटेचा भर ओसरला आहे आणि तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे तिसरी लाट येईल याबाबत नक्‍की खात्री देता येत नाही. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण पार पडले असल्यामुळे संसर्गाचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार ऑक्‍टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच धार्मिक स्थळेही नवरात्रीच्या मुहूर्तावर सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

महाविद्यालय कधी सुरू होणार, याबाबत अद्याप जरी स्पष्टता नसली तरी महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया पूर्णपणे केंद्रीय प्रवेश परीक्षेच्या निकालावर अवलंबून असल्याने पहिल्या वर्षाचे महाविद्यालय सुरू होण्यास आणखी काही वेळ जाणार आहे. तरीही अनेक महाविद्यालय पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शैक्षणिक केंद्रे आणि धार्मिक केंद्रे संपूर्णपणे सुरू होणार असले तरी राज्य सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे, त्या नियमावलीचे पालन करूनच सर्व शिक्षण संस्थांना आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करावे लागतील.

राज्यात अजूनही 18 वर्षांखालील कमी वयाच्या मुलांची लस भारतात उपलब्ध झालेली नाही, ही बाब विसरून चालणार नाही. त्यामुळे जरी शाळेत वर्ग भरणार असले तरी शैक्षणिक संस्थांचे चालक संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग या सर्वांनाच आता काळजीपूर्वक शिक्षण प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. अशीच काळजी धार्मिक संस्थांचा कारभार पाहणाऱ्या विश्‍वस्तांना घ्यावी लागणार आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांवर पालकांचे आणि त्या शाळेतील शिक्षकांचे पूर्णपणे नियंत्रण असल्याने करोना काळातील मूलभूत नियमांचे पालन करणे विद्यार्थ्यांसाठी शक्‍य होणार आहे.

नजीकच्या कालावधीत नवरात्रीच्या आणि इतर धार्मिक उत्सवांच्या कालावधीत धार्मिक स्थळांवरील गर्दी वाढत जाणार आहे. मूलभूत नियमांशी कोणतीही तडजोड न करताच या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आणि दोन व्यक्‍तींमधील योग्य अंतर हे मूलभूत नियम पाळले जात असतानाच सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या व्यक्‍तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत अशाच लोकांना जर प्राधान्याने धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला तर ते योग्य ठरू शकेल.

शिक्षण संस्थातील शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांच्या लसीकरणाबाबतही हीच काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आताच आपली जबाबदारी ओळखून योग्य आणि काळजीपूर्वक पावले उचलली नाहीत तर पुन्हा महामारीचा प्रभाव वाढल्यास शैक्षणिक केंद्र किंवा धार्मिक केंद्रे पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता धूसर होईल.

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या शाळांचे काम व्यवस्थित सुरू आहे आणि धार्मिक स्थळेही खुली करण्यात आली आहेत. यानंतर तेथे करोनाचा प्रभाव वाढला आहे असे दिसत नाही; पण मुळातच महाराष्ट्रात रुग्णांची टक्‍केवारी कमी-जास्त होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काळजी ही घ्यावीच लागणार आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात व ग्रामीण भागातील एखाद्या गावातही सध्या रस्त्यावर दिसणारी गर्दी पाहता त्या मानाने खूपच कमी गर्दी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी किंवा शाळांमध्ये होणार आहे. नजीकच्या कालावधीत शैक्षणिक आणि धार्मिक हे दोन महत्त्वाचे घटक व्यवस्थित सुरू राहिल्यास इतर सर्व घटकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍नही संपून जाईल. अशीच परिस्थिती चित्रपटगृहे आणि नाट्यगृह यांच्या संदर्भात आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांचे कामकाज सुरू झाले आहे. आता महाराष्ट्रातही पुन्हा एकदा मनोरंजनाचा अनुभव प्रेक्षकांना येणार असला तरीही सिनेमा आणि नाटक शौकिनांनीही आपली जबाबदारी ओळखूनच या मनोरंजनाचा लाभ घ्यायला हवा. चित्रपटगृह आणि नाट्यगृह यांचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून या निर्णयाचे स्वागत करून हा निर्णय योग्य प्रकारे अमलात आणायला हवा. शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था आणि मनोरंजन संस्था बंद असल्याच्या कालावधीत त्याचा मोठा फटका या घटकांवर अवलंबून असलेल्या सर्वांनाच बसला.

याचा मोठा अनुभव सर्वांच्याच गाठीशी असल्याने पुन्हा एकदा तोच अनुभव घेण्याची कोणाचीही इच्छा नसणार. आता समाज व्यवस्थेतील हे महत्त्वाचे घटक खुले झाल्याने या घटकांचे व्यवस्थापन करणाऱ्या सर्वांनाच आणि या घटकांचा फायदा घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही आपली जबाबदारी ओळखूनच या निर्णयाचे स्वागत करावे लागेल आणि त्याच गांभीर्याने हा निर्णय अमलात आणावा लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.