– नित्तेंन गोखले
गेल्या महिन्यात, युक्रेनियन ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक ए 50-यू विमान नष्ट झाले. जाणून घेऊया 330 दशलक्ष डॉलर्स किंमत असलेल्या ए 50 हेरगिरी विमानाची वैशिष्ट्ये व त्यामागील इतिहास.
यावर्षी, युक्रेनने रशियाची हेरगिरी करणारी दोन ए 50 विमाने पाडल्याचा दावा केला. पहिले विमान जानेवारीत, तर दुसरे फेब्रुवारीमध्ये ड्रोन हल्ल्यात उडविण्यात आले. युक्रेनच्या हवाई दलाचे प्रमुख मायकोला ओलेशचुक यांनी 23 फेब्रुवारी रोजी रशियाचे ए 50 विमान नष्ट केल्याबद्दल लष्करी गुप्तचर युनिट आणि सैन्याचे आभार मानले. रशियाकडून यावर काहीच वक्तव्य दिले गेले नाही; परंतु रशियाच्या कानेव्हस्कॉय जिल्ह्यात विमानाचे तुकडे सापडल्याचे तेथील वृत्तपत्रात छापून आले. तेव्हापासून रशियाचे ए 50 हेरगिरी (स्पाय) विमान जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.
ए 50 मागील इतिहास
ए 50 विमानाची माहिती जगासमोर आली ती अमेरिकन एजन्सी सीआयएसाठी हेरगिरी करणार्या सोव्हिएत इलेक्ट्रॉनिक्स अभियंता अॅडॉल्फ टोल्काचेव्ह यांच्यामुळे. ए 50 स्पाय प्लेन एक एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (एडब्ल्यूएसीएस) म्हणून काम करते. या विमानाला मेनस्टे व बंबलबी अशी इतर नावे आहेत. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे शोधणे, प्रतिसाद समन्वय, तसेच हवाई क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी ए 50 विमान विकसित केले. साधारण 1970-75 दरम्यान तुपोलेव्ह टीयू 126 लष्करी विमान अप्रचलित होत असल्याने सोव्हिएतने बेरिव्ह डिझाइन ब्यूरोला ए 50 विमानावर काम सुरू करायला सांगितले.
अभियंत्यांनी ए 50 डिझाइनसाठी बेस म्हणून इल्युशिन आयएल-76 लष्करी वाहतूक विमानाचा वापर केला. विमानाची पहिली आवृत्ती 1985 मध्ये सोव्हिएत एअरफोर्सकडे सुपूर्त करण्यात आली. पुढील काळात, 2011 दरम्यान नवीन वैशिष्ट्य असलेली अपग्रेडेड ए 50-यू विमान रशियाने वापरणे सुरू केले. अत्यंत मर्यादित उत्पादन तसेच निर्यात निर्बंधांमुळे, इतर कोणत्याही देशाकडे ही विमाने नाहीत.
विशेष काय आहे?
रशियन हवाई सीमेवर पाळत ठेवणे असो किंवा मग विविध ऑपरेशन्स दरम्यान रशियन एरोस्पेस फोर्सेसच्या विमानांमधील समन्वय सुनिश्चित करणे असो, ए 50 स्पाय प्लेन सध्या दोन्ही बाबीत महत्त्वाची भूमिका बजावतात. स्पाय प्लेन्स देशाच्या हवाई सीमेतील शत्रू आणि अनुकूल (मित्र गटांची) विमान ओळखून, त्यांचा मागोवा घेऊन त्याबाबत डेटा लष्करी कमांडरना पोहोचवण्यात मदत करतात. हे विमान हवेतील तसेच पृष्ठभागावरील टार्गेट्सवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. सोप्या भाषेत, अधिक तसेच कमी उंचीवर उडणार्या विमानांव्यतिरिक्त, ए 50 समुद्रातील जहाज शोधून त्यावर देखील पारख ठेवून हल्ला करू शकते. गुप्तचर विमानात असलेली अत्याधुनिक यंत्रणा शत्रू सैन्याद्वारे वापरला जाणारा संप्रेषण वारंवारता बँड (कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी), रडार सिग्नल व इतर इलेक्ट्रॉनिक उत्सर्जनाचे विश्लेषण करू शकते. यामुळे रशियासाठी शत्रूचे रडार व जॅमिंग स्रोत ओळखून सावध राहणे सोपे झाले.
ए 50-यू विमानाची टेकऑफ करताना 190 हजार किलोग्रॅम वजन घेण्याची क्षमता आहे. त्याची रेंज 5 हजार किलोमीटर आहे. संरक्षण तज्ज्ञ सांगतात, ए 50-यू विमान 900 किमी/तास (490 नॉट्स) इतक्या वेगाने उडू शकते. विमानात रडार ऑपरेटर, फ्लाइट इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ऑपरेटर, रडार ऑपरेटर आणि पायलट यांसारख्या 15 तज्ज्ञांचा क्रू प्रवास करू शकतो. प्लेनचे पाळत ठेवणारे ‘लिआना’ रडार, श्मेल 2-एम रडार सिस्टीम आणि एनपीओ वेगा डिजिटल एव्हियोनिक्स संच या काही प्रमुख सिस्टिम्स आहेत. रशियन अभियंत्यांनी विमानाची रडार प्रणाली इतर अनेक लष्करी उपकरणांशी जुडून (इंटीग्रेटेड राहून) काम करेल अशी प्रोग्राम केली आहे.
लष्करी कारवाई दरम्यान, ए 50 आणि ए 50-यू एकावेळी दहा लढाऊ विमानांना मार्गदर्शन तसेच त्यांचे नियंत्रण करू शकतात. या विमानावरील मॉनिटरिंग सिस्टम 400 मैलांच्या आत असलेल्या 40 हवाई टार्गेट्सचा मागोवा घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर हे विमान 180 मैलांच्या रेंजमध्ये जमिनीवरील 300 टार्गेट्सच्या हालचाली टिपू शकते. शत्रू सैन्य संचलनाचे रेकॉर्डिंग करून मॉस्कोमध्ये बसलेल्या कमांडर्सकडे काही सेकंदातच सर्व माहिती पोहोचते. संरक्षण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मध्य-हवेत इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे, हे अपग्रेडेड विमान नऊ तास हवेत राहू शकते.
पण एवढे अॅडव्हान्सड् विमान गेल्या महिन्यात युक्रेनियन ड्रोनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट कसे झाले? कदाचित, युक्रेन वापरत असलेले काही ड्रोन रडार प्रणालीतून ट्रॅक केले जाऊ शकत नाहीत. विमानात असलेल्या रडार चालकांनी विमानाच्या दिशेने एक अतिशय वेगाने उडणारी वस्तू पाहिली असण्याची शक्यता आहे. परंतु ते काही करू शकण्याआधीच विमानाची राख झाली असावी.
ए 50 विमानांचा वापर
चेचेन युद्ध, जॉर्जिया-रशिया युद्ध व सीरियातील गृहयुद्धादरम्यान ही विमाने वापरली गेली. निश्चितच, गेली दोन वर्ष युक्रेनवर सुरू असलेल्या रशियन आक्रमणात ए 50 स्पाय प्लेन्सचा सतत वापर होतो आहे. यात युक्रेन व त्यांच्या समर्थकांकडून झालेल्या कारवाईत दोन ए 50 विमाने चक्काचूर झाल्यामुळे रशियाचे नुकसान झाले. उपलब्ध माहितीप्रमाणे 1992 पर्यंत 40 ए 50 विमानांचे उत्पादन केले गेले होते. रशियाने कधीही अधिकृतपणे ए 50 च्या ऑपरेशनल संख्येची पुष्टी केली नाही. तथापि, संरक्षण तज्ज्ञांच्या मते पुतीन यांच्या देशात सध्या फक्त सहा कार्यरत ए 50 व ए 50-यू आहेत.
इतर देशातील हेरगिरी विमाने
शत्रूची विमाने, क्षेपणास्त्र व जहाज शोधू शकणारी हवाई रडार प्रणाली असलेली इतर विमाने कोणती? अमेरिकेकडे असलेले यू-2 स्पाय एयरक्राफ्ट, इ-3 सेन्टरी, स्वीडनचे साब 340, चीनचे केजे 2000 आणि भारताकडे नेत्रा एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (एडब्ल्यूएसीएस) विमाने आहेत.