पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

खेड शिवापूर टोलनाक्‍यावरील घटना ः एकास अटक

खेड शिवापूर-खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर पोलीस अधिकारी यांच्या अंगावर मोटारगाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी (वय 40, रा. वाई, जि. सातारा) याच्यावर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजगडचे पोलीस अधिकारी समीर कदम आणि सहायक पोलीस अधिकारी नरेश येमूल हे दोघेजण टोल नाक्‍यावर उपस्थित होते. यावेळी साताऱ्याच्या दिशेने चाललेल्या एका स्कोर्पिओ गाडीत त्यांना बिअरची बाटली दिसली. यावेळी कदम यांनी त्या गाडीचा चालक सूर्यवंशी याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र गाडी बाजूला न घेता चालकाने गाडी कदम यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी कदम यांनी सूर्यवंशी याला पकडून थांबविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सूर्यवंशी याने कदम यांचा हात धरून चालु गाडीत सुमारे पन्नास मीटर फरफटत नेऊन ढकलून दिले. त्यामुळे रस्त्यावर पडल्याने कदम जखमी झाले. हा प्रकार पाहताच टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून सूर्यवंशी याला वरवे येथे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कदम यांनी फिर्याद दिली असून सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.