कराड -सहा महिन्यांपूर्वी निधन झालेल्या पतीचा विरह सहन होत नसल्याने स्वतःच्या सहा व आठ वर्षांच्या दोन मुलांचे गळे आवळून खून करून, आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी कराडच्या रुक्मिणीनगरात उघडकीस आली.
या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. हर्ष (वय 8) व आदर्श (वय 6) अशी दुर्दैवी मुलांची नावे आहेत, तर अनुष्का सुजीत आवटे, असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांना चिठ्ठी सापडली असून, पतीचा विरह सहन होत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनुष्का आवटे या रुक्मिणीनगरात रहात होत्या. त्यांचे पती सुजीत यांचे सहा महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. पतीच्या निधनामुळे आपण व्यथित असून, त्याच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, अशी चिठ्ठी लिहून अनुष्का यांनी पोटच्या पोरांचे गळे दाबून खून केले.
त्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी विषप्राशन करून, स्वत:च्या हाताची नस कापली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइक व परिसरातील नागरिकांनी आवटे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी दोन्ही मुले मृतावस्थेत दिसली. अनुष्का यांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाइकांनी त्यांना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चिमुकल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे कराड शहर हादरले आहे. अनुष्का यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांनी घटनास्थळी भेट दिली.