नवी दिल्ली – दिल्ली ही देशाची राजधानी आहे का बलात्कारांची असा आता प्रश्न निर्माण होत आहे. एका 86 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. येथील नजफगडमध्ये एका शेतात ही घटना घडली. या प्रकरणी एका 37 वर्षांच्या प्लंबरला पोलीसांनी अटक केली आहे. माणुसकीला काळिमा पासणाऱ्या या घटनेमुळे राजधानीतील महिला सुरक्षीत नाहित हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या वृद्ध महिलेची भेट घेतली या प्रकरणात जलदगतीने खटला चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उपराज्यपाल आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना पत्र लिहिणार आहे, अशी माहिती दिल्ली महिला आयोगाने दिली आहे.
ही महिला घराबाहेर दूधवाल्याची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपी प्लंबर तिच्याशी बोलायला आला. तुमचा दूधवाला येणार नाही असे सांगून त्याने तीला अन्य ठिकाणी दूध घेण्यासाठी माझ्याबरोबर या असे सांगितले. ही महिला त्याच्यासह दुचाकीवर बसून जात असताना त्याने एका शेताजवळ गाडी थांबवली व तीला खाली उतरवले.
शेतात तीच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तीने आरडाओरडा केल्याने जवळपासचे लोक जमा झाले व त्यांनी आरोपीला पकडले व याची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत या आरोपीला बेड्या ठोकल्या.या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीवर बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे राजधानीत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.