टोकियो – जपानचे पंतप्रधान फुनिओ किशिदा हे आज एका स्फोटातून थोडक्यात बचावले. प्रचाराच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर एक स्फोटक पदार्थ फेकण्यात आला. पंतप्रधान फुमिओ किशिदा हे या स्फोटातून अगदी थोडक्यात बचावले. फेकलेल्या वस्तूचा स्फोट झाल्यावर गर्दीमध्ये एकच पळापळ झाली आणि या परिसरात धूर पसरला. गर्दीमध्ये उभ्या असलेल्या संशयिताला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या प्राणघातक हल्ल्युाळे 9 महिन्यांपूर्वी दिवंगत पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्या हत्येच्या घटनेची आठवण ताजी झाली.
वायकायामा या भागातल्या सैकाझाकी या बंदराच्या शहरामध्ये स्थानिक निवडणुकीसाठी सत्तारुढ पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. किशिदा हे आपल्या भाषणाला सुरुवात करण्याच्या काही क्षण आगोदर हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नसल्यामुळे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी आपला प्रचाराचा कार्यक्रम पुढे तसाच सुरू ठेवण्याचा आग्रह धरला, असे मुख्य कॅबिनेट सचिवांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गर्दीतील संशयिताने फेकलेली वस्तू काय होती, हे समजू शकले नाही. मात्र ही वस्तू म्हणजे स्मोक किंवा पाईप बॉम्ब असल्याचे समजते आहे. या संशयिताची पार्श्वभुमी आणि त्याच्या हेतूबद्दल बोलण्यास कॅबिनेट सचिवांनी नकार दिला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे आताच काही सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.