नेवासा/सोनई -शिवसेनेचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे खासगी स्वीय्य सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री 9.45 वाजता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्लेखोरांनी राजळेंवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील दोन राजळे यांना लागल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात हल्ल्याचे नेमके कारण समोर आले नाही. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा हल्ला घोडगाव रस्त्यावरील लोहगाव परिसरात झाला. याबाबत त्यांचे बंधू विकास जनार्धन राजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
राहुल राजळे (वय 29 रा. लोहगाव, ता. नेवासा) गेल्या काही वर्षांपासून गडाख यांच्याकडे काम करीत आहेत. शुक्रवारी रात्री सोनई येथील काम आटोपून ते घोडेगाव मार्गे आपल्या घरी दुचाकीवरून निघाले होते. राजळे लोहगाव येथील आपल्या घराजवळ येताच पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सुमारे पाच गोळ्या हल्लेखोरांनी झाडल्या. त्यातील एक राजळे यांच्या पोटात तर दुसरी डाव्या पायाला लागली आहे. तर एक गोळी डाव्या हाताला चाटून गेली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. राजळे यांना नगरला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्रीच डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढल्या. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे सांगण्यात आले.
विकास राजळे यांच्या फिर्यादीवरुन नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा), बबलु लोंढे, संतोष भिंगारदिवे (दोघेही रा. घोडेगाव, ता. नेवासा), ऋषिकेश वसंत शेटे (रा. सोनई, ता. नेवासा) आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तथा गुन्ह्याचे तपासी अधिकारी सचिन बागुल यांनी रात्रीच परिसरातील सर्व रस्त्यावर नाकेबंदी करुन इतर आरोपीचा शोध सुरू केला.
गेल्या काही काळापासून राजळे मंत्री गडाख यांच्याकडे काम करीत आहेत. गडाख यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. नेवासा तालुक्यात सध्या टोकाची राजकीय स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच हा प्रकार झाल्याचा संशय घेतला जात आहे. हल्ल्याची घटना घडल्यानंतर मंत्री गडाख यांनीही यामध्ये लक्ष घातले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
===================