नगर – पारनेर तालुक्यातील वडगाव गुंड येथील शिवाजी गबाजी गुंड यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी गोविंद प्रभु लामखेडे (रा. निघोज ता. पारनेर) याला जिल्हा न्यायाधीश अशोकुमार भिलारे यांनी दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
शिवाजी गुंड व त्यांचे मित्र संतोष विठ्ठल गाजरे हे एका हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी त्यांना आरोपी गोविंद लामखेडे याने फोन करून कुठे आहे, अशी विचारणा केली. गोविंद हा त्याच्या वाहनातून शिवाजी गुंड व संतोष गाजरे जेवण करत असलेल्या हॉटेलमध्ये गेला. मागील राजकीय वादातून गुंड व लामखेडे यांच्यात हॉटेलमध्ये वाद झाले. तेथे लामखेडे याने बंदुकीमधून गुंड याच्यावर गोळी झाडली.
परंतू, गुंड यांनी लामखेडेच्या हाताला झटका दिल्याने बंदुकीतून सुटलेली गोळी हॉटेलच्या भिंतीला लागली. बंदुकीतून गोळी झाडून गुंड यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लामखेडे विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.डी.पवार यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
या गुन्ह्यात सुरूवातील सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. अनिल घोडके व नंतर ऍड. अनिल ढगे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस हवालदार एम.ए.थोरात यांनी मदत केली. सरकारी पक्षाच्यावतीने एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.