बीफच्या दुकानाशेजारी दुकान सुरू केल्याने केले होते हे कृत्य
पुणे – बीफच्या दुकानाशेजारीच दुकान टाकल्याने चाकू, सत्तूरने वार करून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
अफरोज तसदुक कुरेशी (वय 24) आणि इमरोज तसदुक कुरेशी (वय 26, रा. पर्वती दर्शन) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी दोघांवर गुन्हा दाखल होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी 16 साक्षीदार तपासले. जखमी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक विनायाक साळुंके यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुतार यांनी मदत केली. याबाबत सादिक इसाक कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना 3 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 12.15 च्या सुमारास घडली. फिर्यादी यांच्या कार्यालयात घुसून पायावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर चाकू, सत्तूरने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर अबिद कुरेशी घटनास्थळावर जात असताना त्यांच्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाच आहे. दोघांना अधिकाधिक शिक्षा देण्याचा युक्तीवाद ऍड. मच्छिंद्र गटे यांनी केला. त्यानुसार जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नात सात वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड आणि अनधिकृतपणे कार्यालयात प्रवेश करण्याच्या गुन्ह्यात वर्षभर सक्तमजुरी आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.