पालखी सोहळ्याबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न

बारामती/ जळोची -यंदा आषाढीवारी पालखी सोहळ्याची परंपरा टिकवत असताना सध्या करोनाच्या प्रादुर्भावाचा विचारही होणे गरजेचे आहे. कुंभमेळा व इतर बाबतीत घडले आहे. तसे पालखी सोहळ्यात घडू नये. तसेच ही परंपरा टिकली पाहिजे. असा समन्वय साधण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली.
पवार म्हणाले की, दहा मानाच्या पालख्यांसह दुप्पट वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. राज्यातील करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी, पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

वाखरी येथे पालखी पोहोचल्यानंतर तेथे ज्या विधी चालतात त्याला मागील वर्षीपेक्षा यंदा बहुतांशी शिथिलता दिल्याचे त्यांनी सांगितले. वर्षानुवर्षाची ही परंपरा टिकली पाहिजे. वारकऱ्यांच्या भावना जशा तीव्र आहेत. त्या भावनांचा मी आदर करतो. कदर करतो. मान ठेवतो. परंतु करोनाच्या पार्श्‍वभूमीवर वारकऱ्यांसह राज्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत विचार झाला पाहिजे. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की तिसरी लाट येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची शंका व्यक्‍त केल्याचे पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.