एकवीरा देवी मंदिर, राजगड किल्ला येथे रोप-वे

अहवाल तयार करणे सुरू : पर्यटनाला मिळणार चालना

पुणे -श्री एकवीरा देवी मंदिर (कार्ला ता. मावळ) व राजगड किल्ला येथे रोप-वे उभारण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यात येणार आहे.

हे दोन्ही रोप-वे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्याचे प्रस्तावित आहे. हा पथदर्शी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.

रोप-वे प्रकल्पासाठी निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबवण्यासाठी मुंबई येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळ (आयपीआरसीएल) यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला.

त्याचबरोबर राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार करण्यात आला.
ठाकरे म्हणाले, हे सामंजस्य करार पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहेत. एकविरा देवी मंदीर व राजगड किल्ला ही ठिकाणे राज्याचे शक्‍ती आणि भक्‍तीपीठ आहेत.

याठिकाणी रोप-वे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. करारानुसार भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाने सर्व बाबींची एका वर्षात पूर्तता करुन पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. एकविरा देवी मंदिर हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे.

त्याजवळच कार्ला लेणी हे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे. एकविरा देवी मंदिरात दरवर्षी 7 ते 8 लाख भाविक येतात. तर, किल्ले राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची सुमारे 25 वर्षे राजधानी होती.

त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ट्रेकिंगसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. रोप-वेच्या विकासामुळे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.