पुण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 4 वर्षांवर!

पाच क्षेत्रीय कार्यालयांत एक आकडी रुग्णसंख्या

पुणे – शहरातील करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी चार वर्षांवर गेला आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार हा कालावधी सध्या 1,340 दिवस इतका झाला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांत रुग्ण दुपटीचा कालावधी 17 दिवसांपर्यंत खाली आला होता.

दरम्यान, शहरात 15 पैकी 5 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दैनंदिन रुग्णसंख्या एक आकडी झाली आहे. तर उर्वरित 10 ठिकाणी नवी रुग्णसंख्या 2 आकडी आहे. दरम्यान, हडपसर आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक रुग्ण असून त्यांची संख्या दैनंदिन 40 पेक्षा अधिक आहे. शहरात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दैनंदिन करोना बधितांचा दर 4 ते साडेचार टक्‍क्‍यांवर आला आहे.

तो एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 27 टक्‍क्‍यांपर्यंत गेला होता. त्यामुळे शहरात जवळपास सर्वच क्षेत्रीय कार्यालयात 400 ते 900 रुग्ण दैनंदिन सापडत होते. मात्र, आता करोनाची साथ ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर ही रुग्णसंख्या कमालीची घटली आहे.

त्यानुसार, भवानीपेठ, ढोले पाटील रस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, वानवडी आणि येवलेवाडी आणि औंध क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 10 पेक्षा कमी रुग्ण आहेत. तर बिबवेवाडी, कोंढवा, शिवाजीनगर, कोथरूड तसेच वारजे क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 10 ते 20 दैनंदिन रुग्ण असून नगररस्ता, धनकवडी, सिंहगड रोड, हडपसर या क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 20 पेक्षा अधिक रुग्ण आहेत.

राज्यातही करोना आटोक्‍यात
राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. मात्र, असे चित्र असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोनाची स्थिती भयानक आहे. यात पश्‍चिम महाराष्ट्रातील आणि कोकण विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे या जिल्ह्यांमधील परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारला या जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.