सिडनी – ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर होत असलेले हल्ले चिंताजनक असून भारत ते मान्य करणार नाही. भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना अशा कृत्याने किंवा विचारांनी हानी पोहोचवणारा कोणताही घटक स्वीकारला जाणार नाही. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी आज पुन्हा एकदा मला आश्वासन दिले की ते भविष्यात अशा विघातक घटकांवर कठोर कारवाई करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
ऑस्ट्रेलियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. भविष्यात अशा घटकांवर कडक कारवाईचे आश्वासन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दिले आहे. आपल्या ऑस्ट्रेलियन समकक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि मी यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर चर्चा केली आहे. आजही आम्ही या विषयावर चर्चा केली. आम्ही असे हल्ले मान्य कदापीही करणार नाही.
खरं तर, ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये अलीकडेच खलिस्तानी अतिरेकी आणि खलिस्तानी कार्यकर्ते आणि भारत समर्थक निदर्शक यांच्यातील अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियात भारतीय झेंडे जाळण्यात आले आणि एका हिंदू मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. तत्पूर्वी, मार्चमध्ये भारताच्या भेटीदरम्यान अल्बानीज यांनी सांगितले होते की, ऑस्ट्रेलिया कोणत्याही अतिरेकी कारवाया आणि धार्मिक वास्तूंवर हल्ले सहन करणार नाही आणि हिंदू मंदिरांविरुद्ध अशा कृत्याला जागा नाही.
अल्बानीज म्हणाले, “मी त्यांना (मोदींना) आश्वासन दिले की ऑस्ट्रेलिया हा लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणारा देश आहे. मंदिर, मशीद किंवा चर्चवर कसलेही हल्ले सहन केले जाणार नाहीत. अशा गोष्टींना ऑस्ट्रेलियात स्थान नाही. आम्ही आमच्या पोलिस, सुरक्षा एजन्सींच्या माध्यमातून प्रत्येक कारवाई करू. यास जबाबदार असलेल्या कोणालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.