सीरियावरील हल्ला हा इराणला इशारा – जो बायडेन

वॉशिंग्टन, दि. 27 – अमेरिकेच्या हवाईदलाने काल सीरियावर हवाई हल्ले केले. हे हल्ले म्हणजे इराणला इशारा आहे. त्यापासून बोध घेऊन त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इराणला दिला आहे. तुम्हाला बेजबाबदारपणे वागता येणार नाही, त्यामुळे आता काळजी घ्या असे त्यांनी इराणला सुनावले आहे.

अमेरिकन हवाईदलाने सीरियात अनेक ठिकाणी हवाई हल्ले करून तेथे मोठी धडक मारली आहे. इराणशी संबंधीत असलेल्या फौजांवर त्यांनी तेथे हल्ले केले. त्यात जीवित हानी फार झाली नसली तरी या फौजांचे मोठे नुकसान झाले आहे. एक जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत.

गुरूवारी रात्री झालेल्या या हवाई हल्ल्यांचे अमेरिकन प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जोरदार समर्थन केले आहे. हे हल्ले पुर्ण कायदेशीर आणि योग्यच होते असे त्यांनी म्हटले आहे. इराणचे समर्थन लाभलेल्या गनिमी गटाने सीरियातील अमेरिकन हिताला बाधा पोचवण्याचे काम केले होते त्यांना धडा शिकवण्यासाठी हा हल्ला केला गेला. त्यांच्या विरोधात एकूण सात क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यात या गनिमी संघटनांचे नऊ अड्डे उद्धवस्त केले गेले आहेत.

या हल्ल्यांचा अमेरिकेत विरोध होत असला तरी अमेरिकेच्या हितासाठी हे करणे गरजेचे होते अशी बायडेन यांची भूमिका आहे. नजिकचा धोका टाळण्यासाठी असे हल्ले करण्यापुर्वी बायडेन प्रशासनाने अमेरिकन कॉंग्रेसची अनुमती घ्यायला हवी होती, अशी टीका बायडेन यांच्यावर केली जात आहे.

या संबंधात बोलताना व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन पसाकी यांनी पत्रकारांना सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी अध्यक्ष बायडेन यांनी त्यांना देण्यात आलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करूनच ही कृती केली आहे ती समर्थनीय आहे. उत्तर इराक मध्ये अमेरिकन तळावर 15 फेब्रुवारी रोजी या गनिमांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यात अमेरिकन लष्कराचा एक जण जखमी झाला होता. त्यामुळे ही कारवाई करावी लागली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.