मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, आजची घटना दुर्दैवी आहे. पडद्यामागून वातवरण बिघडवण्याचा प्रयत्न केले गेला आहे. आजचे आंदोलन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते.
अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा प्रकार आहे. सरकारने मार्ग काढण्यासाठी सर्व उपाययोजना आणि चर्चा केली. बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या. अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि विशिष्ट गटाची डोकी भडकावून अशी कृत्य घडावीत यासाठी सातत्याने हालचाली करत आहे. महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार त्यांच्या डोळ्यात खुपतंय, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, अस आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं.
नेमकं काय घडलं?
अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत होत्या.