क्रिकेट हा खेळ भारतातच नाही तर जगभर खूप प्रसिद्ध आहे. क्रिकेट माहित नसणारा व्यक्ती सापडणे दुर्मिळच. अशाच या क्रिकेटवेडा समजल्या जाणाऱ्या भारतात असो की इतर देशात अनोखे चाहतेही पाहायला मिळतात. हे चाहते त्यांच्यातील काही वेगळ्या गोष्टींमुळे प्रसिद्ध होतात. 22 यार्डच्या खेळपट्टीवर होणारा रोमांचक सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते काहीही करण्यास तयार असतात.
सामन्याच्यावेळी आपल्या शरीरावर तिंरगा रंगवून भारतीय संघाला चिअर करण्यासाठी प्रसिध्द असलेला सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता सुधीर कुमार चौधरी याची गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या क्रिकेटच्या एका अनोख्या चाहत्याची रंजक गोष्ट सांगणार आहोत. 1999 मध्ये खेळलेला विश्वचषक पाहण्यासाठी या 73 वर्षीय चाहत्याने आपले राहते घर विकले होते.
पाकिस्तान संघाचा मोठा चाहता…
आम्ही बोलत आहोत चौधरी अब्दुल जलील यांच्याबद्दल, जे पाकिस्तान क्रिकेट संघाचे सर्वात आवडते चाहते आणि ‘चाचा क्रिकेट’ म्हणून प्रसिद्ध आहेत. माहितीनुसार, चाचा क्रिकेटने 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला चीअर केले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आणि जवळपास प्रत्येक स्टेडियममध्ये बसून अब्दुल जलीलने आपल्या संघाला प्रोत्साहन दिले आहे.
1969 मध्ये पाहिला होता पहिला सामना…
अब्दुल जलील यांनी 1969 मध्ये लाहोरमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहिला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या वेळी ‘चाचा क्रिकेट’चे वय अवघे 19वर्षे होते. येथूनच त्यांना क्रिकेट पाहण्याचे वेड लागले. त्यांनी 1973 ते 1996 या काळात अबुधाबीमधील एका पंपिंग स्टेशनमध्ये काम केले. तथापि, 1986 मध्ये शारजाह येथे खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये ‘चाचा क्रिकेट’ जागतिक क्रिकेटमध्ये प्रथमच प्रकाशझोतात आले.
मियांदादच्या षटकारांने मिळाली प्रसिध्दी….
1986 मध्ये शारजाहमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात जावेद मियांदादच्या षटकाराने ‘चाचा क्रिकेट’ यांना लोकप्रियता मिळाली. मियांदादच्या बॅटमधून आलेला षटकार ‘चाचा क्रिकेट’ बसलेल्या स्टँडच्या जवळ पडला. यानंतर त्याच्या घोषणाबाजीने आणि विनोद करण्याच्या शैलीने अब्दुल जलील यांना जागतिक क्रिकेटमध्ये एक नवीन ओळख मिळाली आणि काही वर्षातच ते ‘चाचा क्रिकेट’ या नावाने खूप प्रसिद्ध झाले.
सामना पाहण्यासाठी विकले घर…
‘चाचा क्रिकेट’ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 1999 चा विश्वचषक पाहण्यासाठी त्यांनी आपले घरही विकले होते. अब्दुल जलील म्हणाले की, वकार अहमद 1998 मध्ये पीसीबी प्रमुख बनल्यानंतर त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला. त्यानंतर इंग्लंडच्या दूतावासाशी संपर्क साधून त्यांना व्हिसाची मंजुरी मिळाली होती.
तोपर्यंत पाहिलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांची छायाचित्रे घेऊन ‘चाचा क्रिकेट’ इंग्लंड दूतावास ठिकाणी आले होते. मात्र, पैशाअभावी त्यांना सियालकोटमधील घर 15 लाख रुपयांना विकावे लागले होते. ‘चाचा क्रिकेट’च्या म्हणण्यानुसार, आधी ते सामना पाहण्यासाठी जाण्याचा आणि तिकीटांचा खर्च स्वतः उचलत असे, परंतु जागतिक क्रिकेटमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर आता त्यांना कंपन्यांकडून प्रायोजकत्वही मिळते.