बांगलादेशातील वसाहतकालीन हिंदू मंदिरात स्थापित देवीच्या मूर्तीची अज्ञात लोकांनी तोडफोड केली, ज्यामुळे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. स्थानिक पत्रकारांना मंदिर समितीचे अध्यक्ष सुकुमार कुंदा यांनी सांगितले की, ‘अधिकाऱ्यांना बांगलादेशातील झेनैदाह जिल्ह्यातील दौतिया गावातील काली मंदिरात विखुरलेल्या मूर्तीचे तुकडे सापडले. मंदिराच्या आवारापासून अर्धा किलोमीटर अंतरावर मूर्तीचा वरचा भाग पडून होता.’
कुंदा म्हणाले की, ‘काली मंदिर हे औपनिवेशिक काळापासून हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. बांगलादेशमध्ये 10 दिवसांचा वार्षिक दुर्गा पूजा उत्सव संपल्यानंतर 24 तासात ही घटना घडली.’
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘बांगलादेश पूजा उत्सव परिषदेचे सरचिटणीस चंदनाथ पोद्दार यांनी सांगितले की, “जेनैदाहच्या मंदिरात रात्री ही घटना घडली.’
बांगलादेशातील मंदिरात तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 17 मार्च रोजी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिराची तोडफोड करून मूर्ती चोरीला गेल्या होत्या. होळीच्या मुहूर्तावर ही घटना घडली. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 150 अतिरेक्यांनी मंदिरावर हल्ला केला आणि पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू पळवून नेल्या. या अतिरेक्यांनी अनेक भाविकांना मारहाणही केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी, 16 ऑक्टोबर 2021 रोजी बांगलादेशातील नोआखली शहरात एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. यावेळी अनेक भाविकांची जमावाकडून हत्या करण्यात आली.