दौंड तालुक्‍यातील एटीएम सुरक्षा रामभरोसे

दौंड-दौंड तालुक्‍यातील एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक दिसत नसल्याने एटीएमची सुरक्षा ही रामभरोसेच असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक… या बॅंकांच्या एटीएम सुविधा सध्या शहरात उपलब्ध आहेत. या एटीएममुळे नागरिकांना सुविधा मिळत आहेत. मात्र, एटीएमचे संरक्षण करण्यासाठी काही बॅंकांनी खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी एजन्सींना काम दिले आहे; पण या एजन्सीचे सुरक्षा रक्षक एटीएमच्या बाहेर कधीही दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

काही खासगी सुरक्षा रक्षक कामावर असताना एटीएमची सुरक्षा करण्याऐवजी बॅंकेच्या आतील कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी बॅंकेतच काम करत असतात. एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात असतील तर ते एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांवर नजर ठेवू शकतात. एखादी व्यक्ती संशयित वाटल्यास त्याच्याकडे विचारपूस करू शकतात, तसेच एखाद्या ग्राहकाला एटीएममध्ये काही अडचण उपलब्ध झाल्यास त्याला ते मदतनीस म्हणूनच उपयोगी पडतात.

मात्र, असे मदतनीस म्हणून उपयोगी पडणारे सुरक्षा रक्षक एटीएमच्या बाहेरच उभे नसल्यामुळे या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर येत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एटीएमच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांनी जागरूकपणे काम करणे आवश्‍यक आहे.

बॅंकांनी अंमलबजावणी केली, पण…?

मागील आठवड्यात तालुक्‍यातील यवत येथे असणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी चोरून नेले. या मशीनच्या बाहेर मशीनची सुरक्षा करण्यासाठी रक्षक नसल्याने हे मशीन नेण्यास चोरट्यांना अडचण आली नसल्याची चर्चा त्या परिसरात होती. याबाबत दौंडमधील बॅंकांना खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत दौंड पोलिसांनी सांगितले होते, त्यावर काही बॅंकांनी अंमल देखील केला. मात्र, काही बॅंकांनी आमच्या अखत्यारित हा विषय येत नसल्याचे कारण सांगितले. यवत येथील एटीएम मशिन चोरीच्या प्रकारावरून तरी बॅंक प्रशासन जागे होऊन सुरक्षा रक्षक नेमतील का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.