यवत – खोर, पिंपळाचीवाडी (ता. दौंड) येथे रात्रीच्या वेळी बंद असलेल्या घराचे कुलूपकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात असलेल्या लाकडी कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि. 27) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 10 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
चोरीला गेलेला ऐवज
साखळी असलेले कानातील सोन्याचे टॉप्स, सोन्याचे गंठण (3 ग्रॅम 810 मिली), सोन्याचे गंठण (7 ग्रॅम 50 मिली), सोन्याचे नेकलेस (12 ग्रॅम 500 मिली), सोन्याचे गंठण (10 ग्रॅम), कानातील सोन्याचे टॉप्स (3 ग्रॅम), कानातील बाळी, चांदीची जोडवी, चांदीची मासुळी, पैंजण जोड आणि कमरेची चांदीची साखळी, तसेच 16 हजार 200 रुपये रोख रक्कम, असा एकूण 1 लाख 10 हजार 300 रुपयांचा ऐवज.
या प्रकरणी पोपट दशरथ चौधरी (वय 35, रा. खोर, पिंपळाचीवाडी, ता. दौंड) यांनी चोरट्यांविरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी आहे की, गुरुवारी (दि. 27) रात्री चौधरी यांचे कुटुंब जेवण करून खोलीला कुलूप लावून शेजारीच असलेल्या कौलाच्या घरात झोपले होते. फिर्यादी चौधरी हे पहाटे 5 वाजता झोपेतून उठले त्यावेळी त्यांना खोलीच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला दिसला.
घरात जाऊन पाहिले असता घरातील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडा होता. कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पाहणी केली असता दागिने व रोख रक्कम नव्हती. घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीजवळ घरातील सामान व कागदपत्रे चोरट्यांनी टाकलेले दिसले.
चौधरी यांची सासू वारीला गेल्याने त्यांनी त्यांचे सोन्याचा गंठण, चांदीचे पैंजण ठेवण्यासाठी दिले होते. त्याच्यावरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यवत पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.