जिज्ञासा: एटीएमचा शोध

विद्या शिगवंण

आजच्या या आधुनिक युगात जवळपास सर्वच कामे ही मशीनद्वारेच केली जातात. विविध मशीन्स आपले जीवन सुखकर, सोयीस्कर होण्यास मदत करत आहेत. त्यातच एटीएम तर मानवी इतिहासात सर्वांत उपयोगी आणि सोयीस्कर मशीन ठरली.

आज अगदी गल्लोगल्ली, खेडोपाडी एटीएम मशीन्स लागलेली आहेत आणि लहान मुलांपासून ते पेन्शनरांपर्यंत कोणीही एटीएमचा वापर अगदी सहजपणे करताना दिसत आहेत. एटीएममुळे माणसाची मोठीच सोय झाली आहे. वेळ वाचला, श्रम वाचले आणि बॅंकेच्या वेळेतच आर्थिक व्यवहार केले पाहिजेत असे बंधनही राहिलेले नाही. एक वेळ अशी होती जेव्हा लोकांना पैसे काढण्यासाठी बॅंकेत लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. बॅंकेच्या सुटीच्या दिवशी तर सारे व्यवहार ठप्प होऊन जात असत. पण आता एटीएम या मशीनने माणसांना कधीही व कुठेही पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. बॅंकेपर्यंत जाण्यात असमर्थ असलो तर आपण या मशीनद्वारे पैसे काढू शकतो. आज आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पैशांची गरज भासली, तर आपण या मशीनचा वापर करतो. त्यासाठी आपल्याला आता बॅंकेत जायची गरज भासत नाही.

या एटीएम मशीनचा शोध कसा लागला असेल, तो कोणी लावला असेल, जगात पहिल्यांदा या मशीनचा वापर कुठे झाला असेल? पहिली एटीएम मशीन ही कशी दिसत असेल? आणि भारतात एटीएम मशीन सर्वप्रथम कधी आणि कोठे लावण्यात आले असेल? असे अनेक प्रश्‍न कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येतात.

एटीएम मशीनचा शोध स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन याने लावला. जॉन बॅरन शेफर्डचा जन्म भारतात झाला होता हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. पण हे सत्य आहे. 23 जून 1925 रोजी जॉन बॅरन शेफर्डचा जन्म भारतातील आताच्या मेघालय राज्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्फ्रिड बॅरन होते आणि ते स्कॉटिश म्हणजे स्कॉटलंडचे नागरिक होते. जॉनचा जन्म झाला, तेव्हा ते चिटगाव पोर्ट कमिश्‍नरेटचे चीफ इंजिनिअर होते.

जगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर 27 जून 1967 रोजी लंडनच्या बार्कलेज बॅंकेने केला होता, एटीएम मशीनची कल्पना जॉन शेफर्ड यांना कशी सुचली यामागे देखील एक रंजक कहाणी आहे. एकदा जॉन शेफर्ड बॅरन पैसे काढण्यासाठी बॅंकेत गेले होते; पण बॅंकेत पोहोचताच बॅंक बंद झाली, तेव्हा जॉन यांना वाटले की, अशी एखादी मशीन असती ज्यातून आपण हवे तेव्हा पैसे काढू शकलो असतो. मग काय त्यांना जशी ही कल्पना सुचली तसे त्यांनी ही मशीन बनविण्याचे काम सुरू केले. त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीने अखेर त्यांच्या या कल्पनेने मूर्त रूप घेतले आणि जगात एटीएम मशीनचा जन्म झाला. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बॅंकेच्या एका शाखेत लावण्यात आली. भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन 1987 साली मुंबईत सुरू करण्यात आली. हे पहिले एटीएम हॉंगकॉंग ऍण्ड शांघाई बॅंकिंग कॉर्पोरेशनने मुंबईत लावली होती.

आज एटीएम मशीनमध्ये अनेक सुधारणा झालेल्या आहेत. ते सर्वांच्याच सवयीचे झाले आहे. एटीएम मशीनचा शोध लावून जॉन शेफर्ड यांनी सर्व मानवजातीचे कल्याण केले आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.