पारगाव शिंगवे -धामणी (ता. आंबेगाव) येथे श्री म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, शिरूर, भोसरी, पारनेर, संगमनेर येथील नामवंत मल्लांनी हा आखाडा गाजविला. या कुस्त्यांच्या आखाड्यात मुलींच्या कुस्त्या लक्ष्यवेधी ठरल्या.
50 ते 2100 रुपयांपर्यंतच्या कुस्त्या यावेळी लावण्यात आल्या. एकूण 30 हजार रुपयांची बक्षिसे यावेळी विजेत्या मल्लांना देण्यात आली. “सदानंदाचा येळकोट ‘ असा जयघोष करीत मल्लांनी कुस्तीचे डावपेच सादर केले. त्यामुळे कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
शेवटची कुस्ती पैलवान निखिल वाघ विरुद्ध पैलवान सागर लोखंडे यांच्यामध्ये झाली. या रंगतदार कुस्त्यांच्या आखाडयात पंच म्हणून दिनकर भूमकर, सुनील जाधव, विठ्ठल करंजखेले गुरुजी, ठकाशेठ गाढवे यांनी काम पाहिले.
यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष गजाराम पाटील पंचायत समितीचे सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव, ज्ञानेश्वर विधाटे, विलास पगारिया, वामन जाधव, बाळासाहेब वाघ, कैलास वाघ, अविनाश बढेकर, गणपत जाधव,आनंदा जाधव यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कुस्ती शौकीन उपस्थित होते.