नवी दिल्ली – भविष्य निर्वाह निधीच्या ट्रस्टीची बैठक आज झाली. या बैठकीत निधीतील 20% गुंतवणूक शेअर बाजारात गुंतविण्याच्या प्रस्तावावर विचार करणे अपेक्षित होते. मात्र या विषयावर चर्चा झाली नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच भविष्य निर्वाह निधीतील फक्त 15 टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतविण्यात येणार आहे.
आज झालेल्या ट्रस्टीच्या बैठकीत या विषयावर तपशिलात चर्चा करून निर्णय घेण्याची गरज आह असे ठरविण्यात आले. या बैठकीत कामगारांच्या प्रतिनिधींनी या विषयावर अधिक तपशिलात चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जावा अशी मागणी केली आणि ती मागणी मान्य करण्यात आली. भविष्य निर्वाह निधीचे ट्रस्टी हरभजन सिंह सिधू यांनी पत्रकारांना सांगितले की, निधीच्या ट्रस्टीची बैठक 29 आणि 30 जुलै रोजी झाली.
या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली नाही. निधीच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला विरोध केला. शेअर बाजारामध्ये सध्या बरीच अनिश्चित परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांचा निधी शेअर बाजारात गुंतवणे बरोबर होणार नाही अशी भूमिका कामगारांच्या प्रतिनिधींनी घेतल्यानंतर विषय पत्रिकेवरील हा विषय वगळण्यात आला.
सध्या भविष्या निर्वाह निधीतील पाच ते 15 टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतविण्यात येत आहे. हाच निर्णय आगामी काळात अंमलात येणार आहे. भविष्य निर्वाह निधीच्या सल्लागार मंडळांने ही रक्कम 15 टक्क्यावरून 20 टक्के पर्यंत वाढविण्याचा शिफारस केली होती. या शिफारशीवर चर्चा होणार होती. मात्र ऐनवेळी ही चर्चा झाली नाही.
भविष्य निर्वाह निधी 2015 पासून एक्सचेंज ट्रेडेड फंडात 15% पर्यंतची रक्कम गुंतवित आहे. जोपर्यंत सरकार या व्यवहाराला हमी देत नाही तोपर्यंत भविष्य निर्वाह निधीची रक्कम शेअर बाजारात न गुंतवण्याची कामगार संघटनांची मागणी आहे. 2019- 20 मध्ये निधीच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीवर उणे 9% परतावा आला होता. 2020- 21 मध्ये हा परतावा 15 टक्क्यावर गेला आणि 2021 -22 मध्ये हा परतावा 16 टक्क्यावर गेला होता.