एसीबीच्या अहवालानंतर राज्य शासनाचे आदेश : कार्यालयातील भानगडी भोवल्या
पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गेल्या महिन्यात गुन्हा दाखल करून अटक केल्यामुळे तत्कालन प्रभारी विभागीय शिक्षण उपसंचालक व सहायक संचालक प्रवीण अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे. अहिरे यांची आता विभागीय चौकशीही होणार आहे.
सोलापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातील विषय मंजुरीसाठी 26 हजार रुपयांची लाच घेताना या कार्यालयातील शिपाई राजू खांदवे याला ऍन्टी करप्शन पथकाने रंगेहाथ पकडले होते. यानंतर एसीबीने या कार्यालयातील भानगडींची सखोल चौकशी करण्याचा धडाका लावला. खांदवेला अटक करून नंतर सोडण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून सविस्तर माहिती मिळवण्यात आली. अहिरे यांनी लाच घेण्यास प्रवृत्त केल्याची माहिती खांदवे याने दिली. शासकीय कागदपत्रांमध्ये बनावटीकरण केल्याचेही तपासणीत निष्पन्न झाले.
त्यामुळे अहिरेंविरोधात 10 फेब्रुवारीला बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगीही करण्यात आली होती. एसीबी पथकाने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे कारवाईबाबतचा अहवाल तत्काळ पाठवला होता. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे अहवाल पाठवला.
आदेश काढताना प्रचंड गोपनीयता
शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी अखेर तब्बल 25 दिवसानंतर आता प्रवीण अहिरे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत, हे आदेश जारी करताना मंत्रालय ते शिक्षण आयुक्त कार्यालय या स्तरावर खूपच गोपनीयता वागळण्यात आली आहे. निलंबनाच्या आदेशाची प्रत व्हॉट्सऍपवर व्हायरल होऊ नये, याची खबरदारी बाळगण्यात आलेली आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयातून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयालाही आदेशाची प्रत पाठवण्यात आलेली आहे.