निगडी पोलिसांनी पकडले आरोपी, देहूरोडने घेतले श्रेय
पिंपरी – खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यातील चारपैकी तीन आरोपींना निगडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, आपण आरोपींना अटक केल्याची प्रेसनोट काढत देहूरोड पोलिसांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्याची चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.
प्रशांत कैलास भालेकर (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित दीपक ओहाळ (वय 18), डॅनी ऊर्फ रॉनी मनोज फाजगे (वय 24, रा. गंगानगर, आकुर्डी) आणि योगेश राम मानकेश्वर (वय 18, रा. पांढारकर वस्ती, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
भालेकर आणि त्याचे दोन मित्र गुरुवारी (दि. 5) शिरगाव येथे गेले होते. ते परत येत असताना एका हॉटेलमध्ये चार आरोपींनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला. या हल्ल्याची आणि आरोपींची माहिती देहूरोड पोलिसांनी निगडी पोलिसांना दिली. निगडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात तीन आरोपींना अटक करुन देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन केले. शुक्रवारी निगडी आणि देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. यामुळे आरोपींना नेमके कोणी पकडले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.
निगडी पोलिसांनी आम्ही आरोपींना अटक करून देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पत्र दाखविले. यामुळे देहूरोड पोलिसांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत स्वतःचीच पाठ थोपटून घेतल्याचे दिसून आले. देहूरोड पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांचेच नाव टाकले. इतर नावांमध्ये देहूरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे टाकली.
देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर म्हणाले, देहूरोड ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी आणि जखमी हे सर्वजण निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. देहूरोड पोलिसांनी आरोपींच्या नातेतवाईकांना आणून पोलीस ठाण्यात बसविल्याने आरोपी हजर झाले. जर निगडी पोलीस म्हणत असतील की कामगिरी आमची आहे तर त्यांना श्रेय द्या. आमची काही हरकत नाही.