डेहराडून – उत्तराखंडमध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 59 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये 10 विद्यमान आमदारांना स्थान मिळालेले नाही.
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. मागील वेळी 57 जागा जिंकत भाजपने घवघवीत यश मिळवले. मात्र, यावेळी त्या पक्षापुढे सरकारविरोधी लाट थोपवण्याचे आव्हान आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवरील नाराजी विचारात घेऊन भाजपने काही आमदारांचा पत्ता कट केल्याचे समजते. उमेदवारी न मिळालेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री बी.सी.खंडुरी यांच्या कन्या रितू खंडुरी यांचा समावेश आहे. त्याशिवाय, बलात्काराचा आरोप असणारे महेश नेगी आणि वादग्रस्त ठरलेले प्रणव सिंह चॅम्पियन या आमदारांनाही तिकीट देण्यात आलेले नाही. त्यातून बेशिस्त खपवून घेतली जाणार नसल्याचा संदेश भाजपने दिल्याची चर्चा आहे.
भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत 6 महिलांचा समावेश आहे. एकुणात महिला उमेदवारांचे प्रमाण 10 टक्के इतके आहे. उर्वरित 11 जागांवरील भाजप उमेदवारांच्या नावांची अद्याप प्रतीक्षा आहे. त्या बहुतांश जागांवर सध्या कॉंग्रेसचे आमदार आहेत.