आसामच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत बिस्वा सरमा; विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब

गुवाहाटी, दि. 9 – भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांची जागा घेतील. विधीमंडळ सदस्यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

गुवाहाटी येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. त्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर तोमर यांनी सांगितले की, नवनिर्वाचित सदस्यांनी हेमंत बिस्वा सरमा यांची सर्व संमतीने नेतेपदी निवड केली आहे.

आसामचे पायउतार झालेले मुख्यमंत्री सर्बानंद सोनावल आणि हेमंत बिस्वा सरमा यांना काल दिल्लीमध्ये बोलवले होते. यावेळी या दोन नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली होती. त्यानंतर सरमा यांची आसामच्या मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागणार हे जवळपास निश्‍चित झाल्याचे मानण्यात येत होते.

सरमा हे इशान्य भारतातील भारतीय जनता पक्षाचे सर्वात प्रभावशाली नेते म्हणून गणले जातात.ते भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी गेल्या विधानसभेत आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यांनी करोना रोखण्यात बजावलेली कामगिरी देशभरात नावाजली गेली होती.

आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने आपली सत्ता राखली आहे. भाजपने 126 विधानसभा जागांपैकी 60 जागांवर विजय मिळवला असून भाजपचे सहयोगी पक्ष आसाम गण परिषदने नऊ तर पिपल्स पार्टी लिबरलने सहा जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या आधी भाजपने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. हेमंत बिस्वा सरमा यांनी कॉंग्रेसच्या रोमेन चंद्र बोरठाकूर यांचा 1,01,911 मतांनी पराभव केला आणि जालुकबारी या मतदारसंघात विजय मिळवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.