महिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच अस्मिता प्लस योजना- पंकजा मुंडे

मुंबई: राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच अस्मिता प्लस योजना असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, महिला या सन्मानाच्या, शिक्षणाच्या, कुपोषणाच्या आणि स्वच्छतेच्या दुष्काळातून बाहेर पडत आहेत. महिलांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ योग्य दिशेने कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे करण्यात आले होते.

मुंडे म्हणाल्या, राज्य शासन ग्रामीण तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीविषयक कामांवर विशेष कार्य करीत आहे. अस्मिता योजनेबरोबरच, उज्वला योजना, घरकुल योजना, सौभाग्य योजना, शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे, जलयुक्त शिवार आदी योजना महिलांना केंद्रित करूनच राबविण्यात आल्या आहेत. अस्मिता योजना ही राज्यातील महिलांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे.

शासन या योजना संवेदनशीलपणे राबवित असल्याने आज तब्बल १५ लाख ९८ हजार पेक्षा जास्त महिला आणि ४७ हजार पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळेतील मुली या योजनेचा लाभ घेत आहेत. २८ हजार पेक्षा जास्त महिला अस्मिता सॅनिटरी नॅपकिन विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या व्यावसायिक महिलांसाठी अस्मिता प्लस योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकीन पोस्टाद्वारे घरपोच मिळणार असल्याचे सांगून श्रीमती मुंडे म्हणाल्या, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अस्मिता अॅपद्वारे अस्मिता, अस्मिता प्लस व अस्मिता बजार या तीनही योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार  असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या, राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे तसेच त्यांना माफक दरात चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन अस्मिता नावाने शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतात. या नॅपकिनमध्ये सुधारणा करून अस्मिता प्लस या नावाने आता सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या अंतर्गत ११ ते १९ वयोगटातील जिल्हा परिषद शाळांतील मुलींना अनुदानित सॅनिटरी नॅपकिन ५/- रुपये तर ग्रामीण भागातील मुलींना विना अनुदानित सॅनिटरी नॅपकिन २४/- रुपये या माफक दरात देण्यात येणार असल्याची माहितीही श्रीमती विमला यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.