भारतीय मुष्टियोद्धांचा ‘सिक्‍सर’ पंच

कविंदर बिष्टसह सहाजण आशियाई बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

बॅंकॉक – कविंदरसिंग बिष्टसह (56 किलो) अन्य चार भारतीय मुष्टियोद्धांनी चमकदार कामगिरी करत आशियाई बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अमित फंगल (52 किलो), दीपक सिंह (49 किलो) आणि आशिष कुमार (75 किलो) यांनी बिष्टसह पुरुषांच्या गटातून, तर पूजा राणी (75 किलो) आणि सिमरनजित कौर (64 किलो) हिने ड्रॉमधून महिलांच्या गटातून अंतिम फेरीत गाठली आहे. तर भारताची अनुभवी खेळाडू एल. सरिता देवी (60 किलो) आणि गतवेळची रौप्यपदक विजेती मनीषा (54 किलो) यांना कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले.

दीपक सिंहला आज सलग दुस-यांदा वॉकओव्हर मिळाला. कझाकिस्तानच्या तेमिरतास झुसेपोव याने दुखापतीचे कारण देत माघार घेतल्याने दीपक थेट अंतिम फेरीत पोहोचला. कविंदर बिष्टने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या विश्‍वविजेत्या कायरात येरालिएव याला पराभूत केले होते. त्यानंतर मंगोलियाच्या अंख-अमर खाखु याचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम सामन्यात प्रवेश निश्‍चित केला.

स्पर्धेतील अन्य गटातील सामन्यात इराणच्या सय्यदशहिन मौसावी यांच्यावर भारताच्या आशिषने एकतर्फी विजय मिळविला. यात आशिषने प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी न देता सामन्यावर वर्चस्व राखले.
महिलांच्या गटात मनीषाला तायवानच्या हुआंग सियाओ वेन, तर सरिताला चीनच्या यांग वेनलू हिच्याकडून पराभव पत्कारावा लागला. तर पूजाने (75 किलो) कझाकिस्तानच्या फरीजा शोलटेवर विजय मिळवीत आगेकूच कायम राखली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.