Nepal vs India Asia Cup 2023 :पाऊस थांबल्यानंतर दोन्ही पंचांनी मैदानाची पाहणी केली. यानंतर त्यांनी सामना 10 वाजून 15 मिनिटांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.DLS नुसार हा सामना 23 षटकांचा असेल. त्यानुसार भारताला 145 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताने सध्या 2.1 षटकात 17 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत आता भारताला 20.5 षटकात 128 धावा करायच्या आहेत.
कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. नवीन नियमानुसार पाच षटकांचा पॉवरप्ले असेल. तीन गोलंदाज पाच षटके टाकू शकतात, तर दोन गोलंदाज चार षटके टाकू शकतात.
तत्पूर्वी, भारताच्या भेदक गोलंदाजीला सामान्य स्वरुप देत नेपाळसारख्या नवख्या संघाने जबाबदारीने फलंदाजी केली. त्यांनी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघासमोर विजयासाठी 231 धावांचे आव्हान उभे केले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत नेपाळला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यांच्या आसीफ शेख व कुशल बुरटेल यांनी भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपुर लाभ घेतला. या जोडीने 65 धावांची सलामी देताना महंदम शमी व महंदम सिराजसारख्या दर्जेदार गोलंदाजांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
बुरटेल चांगला खेळत असताना 38 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले. बुरटेल परतल्यावर भिम शक्तीनेही निराशा केली. आसीफने मात्र आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, समोरून त्याला कर्णधार रोहित पुडेलसह अन्य कोणत्याही प्रमुख फलंदाजाची साथ लाभली नाही. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने त्यांच्या मधल्या फळीची वाताहत केली.
आसीफने संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 58 धावांवर बाद झाला. त्यानंतर गुलशन झा याने 23 व दीपेंद्रसिंह ऐरेने 29 धावांची उपयुक्त खेळी करत संघाच्या धावसंख्येला हातभार लावला. हे दोघेही पाठोपाठ बाद झाले.
यावेळी फलंदाजीला आलेल्या सोमपाल कामीने आक्रमक फलंदाजी करत अखेरच्या षटकांत वेगाने धावा जमवल्या. त्याचे अर्धशतक हुकले मात्र, त्याने संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन देताना 49 धावांची खेळी केली. त्यात त्याने 56 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 2 षटकार फटकावला. नेपाळचा डाव 48.2 षटकांत 230 धावांवर संपूष्टात आला. भारताकडून जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.