नवी दिल्ली – आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व मराठमोळ्या मालविका बनसोडकडे सोपविण्यात आले आहे. तसेच इंडिया ओपन चॅम्पियन लक्ष्य सेन हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा मलेशिया येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने गत महिन्यात चेन्नई आणि हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारतीय रॅंकिंग स्पर्धेतील कामगिरीला महत्त्व देत भारतीय संघाची घोषणा केली आहे.
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालला पराभूत केले होते. तसेच अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद जिंकत चमकदार कामगिरी केली होती.
बीएआयचे सचिव अजय सिंघानिया म्हणाले, देशांतर्गत स्पर्धांच्या निवडीसाठी आणि टॉप-25 जागतिक रॅंकिंगमधील खेळाडूंची निवड करण्याचा विचार करत आहोत. परंतु बहुतेक ज्येष्ठ खेळाडू कोविड आणि दुखापतीतून बरे होत असल्याने आम्हाला बेंच स्ट्रेंथला संधी देण्याची चांगली संधी आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरुष दुहेरीचे नेतृत्व केरळच्या पीएस रवी कृष्ण आणि उदयकुमार शंकरप्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या जोडीने इंडिया ओपनमध्ये मलेशियाच्या ओंग येव सिन आणि तेओ ई यी या जोडीविरुद्धच्या कामगिरीने प्रभावित केले होते. दुसरीकडे महिला दुहेरीत सिमरन सिंघी-खुशी गुप्ता आणि अनुभवी आरती सारा सुनील-रीझा महरीन या जोडी खेळणार आहेत.
भारतीय संघ
पुरुष (एकेरी) : लक्ष्य सेन, मिथुन मंजुनाथ, किरण जॉर्ज, रघु एम. (दुहेरी) – पीएस रवी कृष्ण/उदयकुमार शंकरप्रसाद, अमसाकरुनन हरिहरन/रुबन कुमार, डिंगकू सिंग कोन्थौजम/मनजीत सिंग खवैराकपम.
महिला (एकेरी) : मालविका बनसोड, आकर्शी कश्यप, अश्मिता चलिहा, तारा शाह. (दुहेरी) – सिमरन सिंघी/खुशी गुप्ता, व्ही निला/अरुबाला, आरती सारा सुनील/रिझा महरीन.