पॅरीस – पाकिस्तानात ईश्वर निंदा केल्याच्या कारणावरून अनेक वर्ष तेथे कारागृहात काढलेल्या असिया बिबी या ख्रिश्चन महिलेने आपल्याला फ्रांसमध्ये आश्रय मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. असिया बिबी यांना पाकिस्तानात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण तेथील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही शिक्षा रद्द करून त्यांना सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसह पाकिस्तानातून सन 2018 साली कॅनडात पलायन केले. त्या सध्या फ्रांस दौऱ्यावर आहेत.
फ्रांसच्या पत्रकार ऍन्ने इसाबेले यांनी असिया बिबीच्या सुटकेसाठी मोठी मोहीम चालवली होती. त्यांनीच आपल्याला जीवनदान दिले आहे त्यामुळे आपण फ्रांसला राहु इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे. असिया बिबी या तुरूंगात असतानाच सन 2014 साली पॅरीसचे महापौर ऍन्ने हिडाल्गो यांनी असिया बिबींना फ्रांसचे मानद नागरीकत्व जाहीर केले होते. ते त्यांना आज प्रदान करण्यात आले.
असिया बिबी यांनी आपल्या पाकिस्तानातील अनुभवावर एक पुस्तक लिहीले असून त्या पुस्तकाची फ्रेंच भाषेतील आवृत्ती आज त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्यात त्यांनी आपल्याला ईश्वर निंदेच्या खोट्या आरोपावरून कसे अडकवण्यात आले होते व आपण फाशीच्या शिक्षेच्या काळात कारागृहात कसे दिवस काढले त्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या सुटकेसाठी जगभरातून पाकिस्तानवर दबाव टाकण्यात आला होता. त्या सध्या कॅनडात अज्ञात स्थळी आपल्या कुटुंबाबरोबर राहात आहेत. जगातल्या अन्य देशांनी पाकिस्तानवर दबाव आणून तेथे ईश्वर निंदेच्या आरोपावरून ज्या असंख्य लोकांना तुरूंगात टाकण्यात आले आहे त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले.