कोपरगाव – शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार अशोक भिमाशंकर खांबेकर (वय ६५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. अशोक खांबेकर यांना गेल्या काही दिवसापुर्वी करोनाची लागण झाल्याने नाशिक येथील अशोका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी आडीजच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अशोक खांबेकर यांच्या पाश्चात्य पत्नी मिनल खांबेकर दोन मुलं, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
अशोक खांबेकर हे कोपरगाव चे रहिवाशी असले तरी त्यांची श्रध्दा शिर्डीच्या साईबाबावर अधिक होती. ते अनेक वर्षे साईबाबा संस्थानचे विश्वस्त म्हणून उत्तम कार्य केले. अनेक गोरगरिबांना संस्थानच्या माध्यमातून मदत केली.
काहींना नोकऱ्या लावून दिल्या तर काहींना मोफत उपचार देवून जीवदान दिले. सर्वांच्या हक्काचा कार्यकर्ता हि ओळख खांबेकर यांची होती. राज्यासह देशभरातील राजकीय, सामाजीक क्षेत्रातील मातब्बर व्यक्ती नेत्यांचा मोबाईल नबर व त्यांचा पुर्व इतिहास तोंडपाठ ठेवणारा चालता बोलता संगणक म्हणजे अशोक खांबेकर अशी अनोखी ओळख होती.
खांबेकर हे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जीवन जगले. कोपरगाव तालुक्यातील नेत्यांनी प्रसंगी पक्ष बदलले पण खांबेकर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पत्रकारीता क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते त्यांनी विविध वर्तमान पत्रासह पी.टी.आय या वृत्तसंस्थेत वार्तांकन केले.
हजरजबाबी व दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून अशोक खांबेकर यांचा परिचय होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीन कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी, पत्रकार बांधव यांनी शोक व्यक्त करून अशोक खांबेकर यांच्या प्रति आदरांजली व्यक्त केली.