इटानगर – अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे.
एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला भाजपने मोठा झटका दिला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीश कुमार यांच्या सहा आमदारांना फोडले आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
याशिवाय, पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए) चे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. पंचायत व महापालिका निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर घडलेल्या या प्रकारामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
रमगोंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, ताली येथील जिकके ताको, कलाक्तंगचे दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिला येथील डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघातील कांगगोंग टाकू यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
यापूर्वी जदयूच्या या सहा आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती न देताच विधानसभेच्या नेतेपदी तालेम तबोह यांची निवड जाहीर केली होती. तसेच पीपीएच्या आमदारालाही या महिन्याच्या सुरुवातीस पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, जदयूने 26 नोव्हेंबर रोजी सियनग्जू, खर्मा आणि टाकू यांना पक्ष विरोधी कार्यवाही केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावित निलंबीत केले होते.