जोहान्सबर्ग – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पणती अशिषलता रामगोबिंन यांना फसवणुकीच्या एका प्रकरणात सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. डर्बनच्या कोर्टाने काल सहा लाख रॅंडच्या फसवणूक प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावली.
अशिषलता रामगोबिंन यांना सोमवारीच या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. काल त्यांची ही शिक्षा जाहीर करण्यात आली. एसआर महाराज नावाच्या एका व्यक्तीला फसवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
56 वर्षीय लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि मेवा रामगोबिंन दाम्पत्याच्या कन्या आहेत. लता रामगोबिंन यांच्या विरोधातील हा खटला सन 2015 पासून प्रलंबित होता. भारतातून तीन कंटेनर भरून लिनन कापड मागवण्यात आल्याच्या व्यवहाराच्या खोट्या पावत्या सादर करून त्यांनी संबंधितांची फसवणूक केल्याचा आरोप होता.
आपल्या मालाची कस्टम कडून सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काही रक्कम लागणार आहे असे सांगून त्यांनी महाराज नावाच्या इसमाकडून पैसे घेतले होते. तसेच अन्यही कारणे दाखवून त्यांनी महाराज नावाच्या इसमाकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. लता रामगोबिंन या दक्षिण आफ्रिकेत पर्यावरणवादी व मानवी हक्कांच्या कार्यकर्त्या म्हणूनही कार्यरत आहेत.