पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरात राज्यात तयार होत आहे. या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्टेशन असतील या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या, खेळ, दूध नगरी, फलाहार, विज्ञान, अश्या विविध विभागांत त्या त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाईन या सर्व विभागांसाठी क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हणून आणि यातील एक महत्त्वाचा विभाग असलेल्या ’माॅं की रसोई’ साठी मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदी गीत लिहिले असून प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी गायिले आहे.
महेश टिळेकर यांची संकल्पना, दिग्दर्शन असलेल्या या गाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आज्जीच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळतील.”पान खायो सय्या हमार” हे प्रसिद्ध गाणे आशाताईंनी वहिदा रेहमान यांच्यासाठी गायले होते. यावेळी पुन्हा एकदा ८६ वर्षाच्या आशाताई, ८२ वर्षाच्या वहिदा रेहमान यांच्यासाठी महेश टिळेकर यांनी लिहिलेल्या “माॅं की रसोई” या गीतासाठी तब्बल ५० वर्षांनंतर गाणार आहेत. बर्ड फ्लू, चिकुन गुनिया साठी महेश टिळेकर यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेली गाणी खूप लोकप्रिय होऊन त्याची लिम्का बुक नॅशनल रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.