उपक्रमशील सोसायट्या : रोजलॅंण्ड सोसायटीला पर्यावरण रक्षणाचा ध्यास

पिंपरी – पिंपळे सौदागर येथील रोजलॅण्ड सोसायटीने कचऱ्यापासून खत निर्मिती, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवून पर्यावरणपूरकतेचा ध्यास घेतला आहे. सोसायटीच्या परिसरामध्ये आत्तापर्यंत सुमारे तीन हजार झाडे लावण्यात आली आहेत. पर्यावरण रक्षणाचे काम करतानाच चिमण्यांसाठी घरटी आणि पिण्याचे पाणी अशी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

रोजलॅण्ड सोसायटीमध्ये 34 इमारतीत 982 सदनिका असून 3 हजार 700 नागरिक राहतात. कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे दररोज 750 ते 800 किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून निर्माण होणारे खत उद्यानासाठी वापरले जाते. त्यानंतरही शिल्लक राहणाऱ्या खताची विक्री करण्यात येते. येथे 4.5 लाख लिटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. प्रत्यक्षात दीड ते दोन लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेले सांडपाणी उद्यानासाठी वापरले जाते, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर यांनी दिली.

पाणी टंचाईवर उपाय

पाणीटंचाईवर उपाय म्हणून सोसायटीने पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविला आहे. टेरेसवर जमा होणारे पावसाचे पाणी फिल्टरद्वारे बोअरवेलमध्ये सोडून बोअरवेलचे पुर्नभरण केले जात आहे. या उपक्रमात दोनशे रेन वॉटर फिल्टर्सच्या माध्यमातून 19 बोअरवेलमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे सोसायटी गेल्या नऊ वर्षांपासून “टॅंकर फ्री’ सोसायटी झाली आहे. सोसायटीतील 90 टक्के घरांमध्ये वॉटर एरिएटर्सची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे दररोज 30 टक्के पाण्याची बचत होत आहे. सोसायटीमार्फत प्रत्येक घरात पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. पर्यावरणपूरक प्रकल्पांमुळे गेल्या दोन वर्षांपासून सोसायटीला महापालिकेच्या मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या सामान्य करामध्ये सवलत मिळत आहे.

सामाजिक उपक्रमात हातभार

सोसायटीतील रहिवाशी विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. सोसायटीतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील बेबी गावातील ग्रामपंचायतीच्या शाळेत 65 सायकली देण्यात आल्या. त्याशिवाय, “स्नेहवन’ या स्वयंसेवी संस्थेतील मुलांना सायकली आणि आर्थिक मदत देखील केली आहे. विविध सण, उत्सव, जयंती मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

चिमण्यांसाठी “इको-फ्रेंडली’ घरटी

सोसायटीच्या परिसरामध्ये चिमण्यांसाठी 200 ते 250 “इको-फ्रेंडली’ घरटी बसविण्यात आली आहे. त्याशिवाय, त्यांना पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्यांची सोय केलेली आहे. तसेच, प्लॅस्टिकचे बर्ड फीडरदेखील बसविले आहेत. त्यामध्ये धान्य टाकण्यात येते. सोसायटीच्या परिसरात 2008 पासून सुमारे तीन हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चिंच, आंबा, कडुनिंब, लिंबू, जांभुळ, पेरू, सिताफळ, रामफळ आदी झाडांचा समावेश आहे. सोसायटीतील दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच, कमी वीज लागणारा पाण्याचा पंप बसविला आहे. त्यामुळे दरमहा सुमारे दीड लाख रुपयांचे वीज बिल कमी झाले आहे. सोसायटीत ज्येष्ठांसाठी ग्रंथालय बनविलेले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)