जोधपूर – लैंगिक शोषण प्रकरणातील दोषी आणि जन्मठेपेची शिक्षा झालेले आसाराम बापूंची प्रकृती गेल्या पाच दिवसांपासून ढासळत आहे. शनिवारी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना जोधपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS Jodhpur) दाखल करण्यात आले आहे. आसाराम बापूंचा ताप अनेक दिवसांपासून उतरत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्समध्ये दाखल झाल्यानंतर आसाराम बापू यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत त्यांच्या यकृतातील एन्झाईम्स वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. युरिनरी इन्फेक्शनबाबतही डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या आसाराम बापू यांना रुग्णालयाच्या सामान्य आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थीर आहे.
48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार –
एम्स जोधपूरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापू यांना सध्या 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून ताप होता. रुग्णालयाच्या चिकित्सालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा होत नसल्याने जेल मॅन्युअलनुसार आसाराम बापू यांचे वय आणि आजार पाहता एम्समध्ये दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे आसाराम यांना शनिवारी (6 नोव्हेंबर 2021) सकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले.
आसाराम बापू यांना तापासोबतच वृद्धापकाळात होणारे इतर आजारही असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये यूरोलॉजीशी संबंधित समस्या प्रमुख आहेत. यामुळे त्यांना शनिवारी सकाळी ओपीडीमधून थेट युरोलॉजी विभागात सर्व चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.
रुग्णालय परिसरात कडक सुरक्षा –
रुग्णालय प्रशासनाच्या अंतर्गत सुरक्षा शाखेनेही खबरदारीची पावले उचलली आहेत. यासोबतच रुग्णालयाने खबरदारी म्हणून पोलिसांनाही माहिती दिली आहे. एका महिन्यात आसाराम यांना तब्येत बिघडल्याने दोनदा तुरुंगातून रुग्णालयात न्यावे लागले होते. रुग्णालयात आसाराम समर्थकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी शनिवारी दुपारपासूनच कडक बंदोबस्त ठेवला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून आसाराम बापू जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. लैंगिक अत्याचारप्रकरणी आसाराम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसाराम यांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते. मात्र कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातूनही त्यांना तुरुंगातून बाहेर पडण्याची संधी मिळू शकली नाही. आसाराम यांच्यावर याआधीही काही आजारांमुळे कारागृह प्रशासनाने जेलबाहेरील रुग्णालयात उपचार केले होते.