अकोले -अकोले येथे वाईन शॉपचे शटर वर जाताच आज अकोले येथे ठिकाणी तळीरामांनी रांगा लावून दारू खरेदी केली. अकोले येथे आज दुसऱ्या दिवशीही बहुतेक दुकाने उघडली गेली. सकाळी नऊ ते दुपारी एक, अशी वेळ या दुकानांना दारू विकण्यास परवानगी देण्यात आली होती. आज इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, धान्य दुकाने सुरू झाल्याचे पहावयास मिळाली. मात्र हॉटेल बंदच राहिली. फळ विक्रेत्यांनी ठिकठिकाणी आपली दुकाने थाटून आपल्या मालाच्या विक्री करण्यावर भर दिला. विशेष बाब म्हणजे तळीरामांसाठी वाईन शॉप सकाळी 9 ते सायंकाळी पाच पर्यंत सुरू राहणार असल्याने ठिकठिकाणच्या वाईन शॉपपुढे मद्यपीनी रांगा लावल्या होत्या.
जिल्हा सहकारी बॅंकेच्या पूर्वेला, त्याचबरोबर अकोले-देवठाण-समशेरपूर रस्त्यावर दोन, मिळून तीन ठिकाणी दारू दुकानांसमोर रांगा लागलेल्या होत्या. विशेष बाब म्हणजे प्रत्येकाला साठ रुपये किमतीची छोटी देशी दारूची बॉटल देऊन दुकानदारांनी त्यांना तातडीने मुक्त केले. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेलेले दिसले नाही. जिल्हा सहकारी बॅंकेच्या पूर्वेला असणाऱ्या दुकानाच्या पुढे सकाळी जवळपास अर्धा किलोमीटर रांग लागली होती. गर्दी झाल्याने पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी संबंधित ठिकाणी भेट देत दुकानदारास बॅरिकेडिंग करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर बॅरिकेडिंगचे काम सुरू झाले. एखाद्या सिनेमागृहासमोर तिकीट खरेदी करणारी रांग आणि ही रांग साम्य दाखवणारी वाटली. अकोले-देवठाण- समशेरपूर रस्त्यावर दोन ठिकाणी या रांगा होत्या. मात्र लहामगे कॉम्प्लेक्सच्या समोर असणारी रांग केवळ रांगच दिसली. मात्र तेथे तेथील शटर वर गेलेले दिसले नाही. गजानन महाराज ते गंगाधरेश्वर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वाईन शॉपसमोर मोठी रांग लागली होती. कडाक्याचे ऊन असूनही तळीरामांची गर्दी हटत नव्हती आणि या उन्हाचा या तळीरामांना अजिबात त्रास जाणवत नसल्याचे दिसून आले. या प्रत्येक ठिकाणी हॅंडवॉश आणि सॅनिटायझरची सोय मात्र नेमकेपणाने करण्यात आल्याचे माहिती घेता उघड झाले.