नवी दिल्ली – देशभरातील हजारो गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केल्याच्या कारणावरून देशभर चर्चेचा विषय ठरलेला अभिनेता सोनू सूद याच्यावरही आता आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली आहे.
आयकर विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणांवर सर्व्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व्हेत संबंधित व्यक्तीचे प्रत्यक्ष उत्पन्न आणि कागदपत्रांमध्ये दाखवलेले उत्पन्न याच्याशी संबंधित माहिती मिळवली जाते. हा प्रत्यक्ष छापा नसतो फक्त ती प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न असतो.
याच विषयावरुन आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आलीय. सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत, असा दावा अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलाय. तसंच तुमचा हा पोरखेळ डाव एक दिवस तुमच्याच अंगावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
काय आहे आजचा सामना अग्रलेख
भारतीय जनता पक्ष हा जगभरात सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठय़ा राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यांतील सरकारे असतील किंवा वेगळय़ा विचारांचे लोक असतील, त्या विरोधी विचारांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठेपण आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे 12 आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही!
सिने अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकल्या आहेत. सोनू सूद किंवा एखाद्या सिनेकलाकारावर आयकर विभागाने धाड टाकणे यात आश्चर्यकारक किंवा धक्कादायक असे काहीच नाही. सिनेसृष्टीतला बराचसा व्यवहार हा रोखीत होतो. त्यास सध्याच्या भाषेत ‘ब्लॅक मनी’ म्हटले जाते.
श्रीमान सोनू सूद याच्या अकाऊंट बुकमध्ये काहीतरी गडबड आहे असे आयकर विभागाच्या लक्षात आले व त्यांनी धाडसत्र सुरू केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरू झाला.
बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. तेव्हा ”जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?” असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱयांत भाजप पुढे होता.
सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनू महाशयांनी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. सोनू कोरोना काळात मजुरांना मदत करीत होता.
सोनूने देशातील 16 शहरांत ऑक्सिजन प्लॅण्ट लावले, स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमांतून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत. महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले. तोपर्यंत सोनू हा या मंडळींना आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता.
सोनू महाशय जे महान समाजकार्य करीत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते, पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले. आयकर विभागाने सोनूला पिळून काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जे भाजपशी संबंधित नाहीत अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करायचा हे एक धोरण ठरले आहे. त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार व सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या भुताटकीने गेल्या काही महिन्यांत अनेकांना पछाडले आहे. महाराष्ट्रातील मंत्री अनिल देशमुख, अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक यांना या तपास यंत्रणांच्या जाळय़ात अडकविण्याचाच डाव आहे. भाजपचे काही चवचाल पुढारी हे स्वतःच्या बाथरूममध्ये घुसावे तसे रोज ‘ईडी’ कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत.
हा इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळाशिवाय येणे शक्यच नाही. कोणीतरी एक गुन्हेगार, बडतर्फ अधिकारी आरोप करतो, त्याच्याकडून ‘आरोप’ वदवून घेतले जातात व त्याबरहुकूम केंद्रीय तपास पथके भाजपविरोधकांच्या हात धुऊन मागे लागतात.