पुणे – घाटमाथ्यावर वरुणराजा जोरदार बरसला असून, गेल्या 24 तासांत पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात सर्वाधिक 210 मिमी पावसाची नोंद झाली. तर शिरगाव येथे 209 मिमी पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागाने घाटमाथा परिसरात मुसळधार ते जोरदार (ऑरेंज आणि यलो अलर्ट) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
जोरदार पावसामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेले फेसाळलेले धबधबेही उंचावरून पडू लागले आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे 60 ते 70 मिमी पावसाची होणारी नोंद गेल्या 24 तासांत तब्बल 150 ते 200 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली. तर, लोणावळा 135, शिरगाव 209, शिरोटा 106, ठाकुरवाडी 99, वळवण 107, अंबवने 115, भिवपुरी 129, धावडी 144, डुंगरवाडी 165, कोयना 110, खोपोली 156, खंद 136 ताम्हिणी 210, भिरा 125, धारावी 66 मिमी पावसाची नोंद झाली.
प्रवास, पर्यटन टाळा
घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस (दि.2 ते 5 जुलै) पावसाचा जोर काहीसा ओसरेल. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून, घाटमाथ्यावर ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या घाटमाथ्यावर दरड कोसळले, रस्ते निसरडे झालेले आहे. धबधबे किंवा फोटोशुटसाठी तरुणाई डोंगरभागात जाते. त्याठिकाणी निसरड्या रस्त्यावर पाय घसरून अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे पर्यटकांनी घाटमाथ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन पुणे वेधशाळेसह प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अर्धा टीएमसी साठा वाढला
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कमी असला, तरी घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचे पाणी धरणांमध्ये येत आहे. गेल्या 24 तासांत खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांत सुमारे 0.45 टीएमसी (सुमारे अर्धा टीएमसी) पाणी वाढले आहे. शनिवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा 5.23 टीएमसी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा साठा 4.83 टीएमसी होता. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत रात्रीच्या वेळी चांगला पाऊस होत आहे. तसेच पुढील काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानेही वर्तविल्याने धरणांत येणारे पाणी वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.
शनिवारी दिवसभरात खडकवासला-7, पानशेत-19, वरसगाव-19 तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर खडकवासला धरणात 0.98 टीएमसी, पानशेत 1.84 टीएमसी, वरसगाव धरणात 2.19 टीएमसी पाणीसाठा आहे. तर या चारही धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट आहे.+