वॉशिंग्टन – भारतातील 80 टक्के लोकांना पंतप्रधान म्हणून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हवे आहेत. पंतप्रधान मोदींबद्दल या भारतीयांचा दृष्टीकोन अनुकूल आहे. तर अलिकडच्या काळात भारत जास्त प्रभावशाली देश बनला आहे, असे 10 पैकी 7 भारतीयांना वाटते आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे.
“जी-20′ परिषदेच्या काही दिवस आगोदर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. भारतातील जनसामान्यांची मानसिकता सकारात्मक आहे. देशातील 46 टक्के लोकांची मानसिकता अनुकूल तर 34 टक्के लोकांची मानसिकता प्रतिकूल असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणातील 16 टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.
भारतातील बहुतेक लोकांना इस्रायलबद्दल अनुकूल मत वाटते आहे. तर 71 टक्के लोक आपल्याच देशाबद्दल अनुकूल आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. “प्यू रिसर्च सेंटर’ चे हे सर्वेक्षण 20 फेब्रुवारी ते 22 मे दरम्यान केले गेले होते.
यासाठी भारतासह 24 देशांमधील 30, 861 प्रौढांची मते विचारात घेतली गेली होती. पंतप्रधान मोदींबाबत जगभरातील मत, भारताचा जगभरातील प्रभाव आणि अन्य देशांवरील भारताचा प्रभाव देखील तपासण्यात आला होता.
पंतप्रधान म्हणून 10 पैकी 8 भारतीयांनी मोदींनाच पसंती दिली आहे. त्यातील 55 टक्के लोकांनी सर्वात जास्त पसंती मोदींना दिली आहे. पंतप्रधान म्हणून मोदींची ही दुसरी टर्म आहे आणि ते आता तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची तयारी करत आहेत.