पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील तब्बल 4 हजार 368 पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जोरावर महापालिकेचा गाडा हाकला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच दर महिन्यास किमान 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत. महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. तब्बल 4 हजार 368 इतकी पदे व नव्याने निर्माण झालेली पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारामुळे उघड झाले आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत. पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील अ, ब, क आणि ड या श्रेणीत एकूण 356 संवर्ग आहेत. यात मंजूर पदांची संख्या 11 हजार 513 आहे. त्यापैकी 7 हजार 124 इतकी पदे भरली आहेत. तर 4 हजार 368 इतकी पदे रिक्त आहेत. अ श्रेणीत एकूण 121 संवर्ग आहेत. त्यात 281 पदे मंजूर असून त्यापैकी 165 पदे भरलेली असून 116 पदे रिक्त आहेत. ब श्रेणीत एकूण 47 संवर्ग आहेत. त्यात 324 पदे मंजूर असून त्यापैकी 207 पदे भरलेली असून 117 पदे रिक्त आहेत. क श्रेणीत एकूण 154 संवर्ग आहेत. त्यात 5350 पदे मंजूर असून त्यापैकी 3397 पदे भरलेली असून 1953 पदे रिक्त आहेत. ड श्रेणीत एकूण 27 संवर्ग आहेत. त्यात 2965 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1724 पदे भरलेली असून 1241 पदे रिक्त आहेत. ड-सफाई संवर्ग श्रेणीत 7 संवर्ग आहेत तर त्यात 2593 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1652 पदे भरलेली असून 941 पदे रिक्त आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून उघडकीस आले आहे. पिंपरी महापालिकेत अत्याधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, कंत्राटी पद्धतीने उपलब्ध मनुष्यबळात नियमित कामांचा गाडा ओढला जात आहे. मात्र, पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. रिक्त पदांमुळे सेवेत दिरंगाई होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने हि रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता आहे.
भरती परीक्षेला विलंब होण्याची शक्यता
महापालिकेच्या गट ब आणि क या सवंर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने अर्जही मागविले आहेत. या 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार आले आहेत. यामधील सुमारे 90 हजार जणांनी परिक्षेचे शुल्क भरले आहे. या सर्व पदांची परिक्षा घेण्यास टीसीएस कंपनीला नियुक्त केले आहे. मात्र, मोठ्या संख्येत अर्ज आल्याने परिक्षेचे नियोजन कधी करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.