नवी दिल्ली – येथील रोहिणी जिल्हा न्यायालयातील एका दालनात गुरूवारी सकाळी कमी तीव्रतेचा स्फोट झाला. त्यामध्ये एक जण जखमी झाला. स्फोटामुळे काही काळ संबंधित परिसरात घबराटीचे वातावरण पसरले.
तसेच, न्यायालयाचे कामकाज स्थगित ठेवण्यात आले. स्फोटाची माहिती समजताच तातडीने अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पाठवण्यात आले. त्याशिवाय, न्यायवैद्यक आणि एनएसजीची पथकेही दाखल झाली. त्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली.
स्फोटाचे नेमके कारण तातडीने स्पष्ट होऊ शकले नाही. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका लॅपटॉप बॅगेत स्फोट झाला. त्यामध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती का याची छाननी केली जात आहे. त्याशिवाय, लॅपटॉप बॅग कुणी ठेवली याचाही शोध घेतला जात आहे.